हुबळी इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनीने (हेस्कॉम) गेल्या 18 मार्च 2023 पासून विजेची सर्व ऑनलाईन बिल फक्त बीबीपीएस (भारत बिल पेमेंट सिस्टीम) ॲपच्या माध्यमातून भरून घेतली जातील असे जाहीर केले. त्यामुळे ग्राहकांना आता फक्त हेस्कॉम वेबसाईटच्या माध्यमातूनच बिले भरावी लागत आहेत. याचा अर्थ सोयीची ठरणारी जीपे, फोन पे, सीआरइडी, पेटीएम वगैरे यूपीआय ॲप्सची सुविधा आता दुर्दैवाने उपलब्ध नाही. मात्र पुढील पाच-सहा दिवस सर्व कांही ठीक झाले तर या ॲप्सद्वारे बिल भरण्याची सुविधा पुन्हा उपलब्ध होणार आहे.
गेल्या दोन महिन्यापासून ग्राहकांना विजेचे ऑनलाइन बिल भरण्यासाठी हेस्कॉम वेबसाईटचा अवलंब करण्यास सांगितले जात आहे. यूपीआय पेमेंट ॲप्सचा वापर करून बिल भरणाऱ्या अनेक मंडळींसाठी ही वेबसाईट गैरसोयीची ठरत आहे. त्यासाठी पुन्हा युपीआय आधारित बिल भरण्याची पद्धत सुरू करावी अशी जोरदार मागणी केली जात आहे.
हेस्कॉमच्या सूत्रानुसार ऑनलाइन बिल भरण्याची सेवा बंद करण्यात आलेले नाही तथापि टेंडर चुकल्यामुळे यूपीआय पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर असलेल्या बँक ऑफ बरोडाने आपली सेवा पुढे सुरू ठेवण्यासाठी हेस्कॉमकडे सेवा दराच्या तीनपट अधिक रकमेची मागणी केली आहे. आणि यूपीआय पेमेंट सेवेसाठी बँकेला तीन पट अधिक दर देणे हेस्कॉमला परवडणारे नाही. परिणामी हेस्कॉम अन्य सर्व्हिस प्रोव्हायडरशी संलग्न होण्याचा प्रयत्न करत आहे.
मात्र मॉडेल कोड ऑफ कंडक्टमुळे (एमसीसी) ते शक्य झालेले नाही. त्यामुळेच यूपीआय पेमेंट सेवा पुनश्च सुरू होण्यास जवळपास दोन महिने विलंब झाला आहे. मात्र आता वर्क ऑर्डर जारी होताच एअरटेल बँकेकडून ती सेवा दिली जाणार आहे. त्यामुळे सर्व काही व्यवस्थित झाल्यास येत्या पाच-सहा दिवसात वीज ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच ऑनलाइन बिल भरता येणार आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणूक समाप्त होताच कर्नाटक इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशनने (केइआरसी) राज्यात वीज दर वाढीला मंजुरी दिली आहे. इस्कॉम्सने प्रारंभी प्रति युनिट 139 पैसे दरवाढ करावी अशी विनंती केली होती. मात्र केइआरसीने हा दर 70 पैसे इतका निश्चित केला आहे. ही नवी वीज दरवाढ गेल्या 1 मे 2023 पासून राज्यभरात लागू झाली आहे.