आपल्या आईचे पार्थिव चार दिवस शवागारात ठेवून तिच्या अंत्यसंस्कारासाठी पैशाची जमाजमा करणाऱ्या एका गरीब इसमाच्या मदतीला धावून जात महापालिकेच्या मोफत अंत्यसंस्कार उपक्रमांतर्गत त्या मातेच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांची प्रशंसा होत आहे.
याबाबतची माहिती अशी की, आजारपणामुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या शकुंतला ताळूकर (वय 74) या वृद्ध महिलेचे गेल्या मंगळवारी निधन झाले. तिचा मुलगा राजू ताळूकर याची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे अंत्यसंस्काराचा प्रश्न उपस्थित झाला होता.
त्यावेळी राजूने आपल्या आई वरील अंत्यसंस्कारासाठी पैशाची जमवाजमव करण्यासाठी वेळ मागून घेतला. त्यामुळे शकुंतला यांचा मृतदेह शिवागारात ठेवण्यात आला होता. तथापि अंत्यसंस्काराच्या पैशासाठी चार दिवस सर्वत्र धावाधाव करूनही पुरेसे पैसे जमा न झाल्यामुळे निराश झालेल्या राजू याला सिव्हिल हॉस्पिटल मधील कर्मचारी राहुल याने सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांचे नांव सुचविले.
तेंव्हा राजू ताळुकर याने अनगोळकर यांच्याशी संपर्क साधून वस्तुस्थिती सांगितली. तेंव्हा सुरेंद्र अनगोळकर यांनी तात्काळ हालचाल करून शकुंतला ताळुकर यांच्यावर महापालिकेच्या मोफत अंत्यसंस्कार उपक्रमांतर्गत शहापूर स्मशान भूमीमध्ये गाईच्या गोवऱ्यांवर अंत्यसंस्कार करविले.
याप्रसंगी बोलताना सुरेंद्र अनगोळकर यांनी राजू टाळूकर या युवकावर ओढवलेल्या प्रसंगाची थोडक्यात माहिती दिली. तसेच महापालिकाच्या माध्यमातून गाईंच्या गोवऱ्यांवर मोफत अंत्यसंस्काराची सोय करण्यात आली आहे. ही सुविधा फक्त गरिबांसाठी नसून सर्व गरजू लोकांसाठी खुली आहे. तेंव्हा अंत्यसंस्काराच्या बाबतीत अडचण निर्माण झाल्यास कोणीही खचून न जाता या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अनगोळकर यांनी केले.