कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी परवानाधारकांकडून पोलीस ठाण्यात जमा करून घेण्यात आलेली बंदूका वगैरे परवाना असलेली शस्त्रे आता निवडणूक संपल्याने पुन्हा संबंधितांना परत दिली जात आहेत.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्ह्यातून एकूण 7,720 बंदुका सरकार जमा अर्थात पोलीस ठाण्यात जमा झाल्या होत्या.
बेंगलोर नंतर बेळगाव जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात बंदूका वगैरे शस्त्र परवानाधारक आहेत. पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत 1535 परवाना असलेल्या बंदुका आहेत. तर जिल्हा पोलीस प्रमुखांच्या कार्यक्षेत्रात 6,185 जणांकडे परवाना असलेली बंदुका वगैरे शस्त्रे आहेत. शेती संरक्षण आणि आत्मसंरक्षणासाठी संबंधितांना संपूर्ण शहानिशेअंती वापरण्यास दिलेली ही सर्व प्रकारची शस्त्रे निवडणूक संपेपर्यंत पोलीस ठाण्यातच जमा होती.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून निर्भयपणे मतदान प्रक्रिया पार पडावी यासाठी ही शस्त्रे सरकार जमा करून घेण्यात आली होती.
मात्र आता आचारसंहितेसह विधानसभा निवडणूक सुरळीत पार पडली असल्यामुळे संबंधित परवानाधारकांना बंदुका, रिव्हॉल्वर वगैरे त्यांची त्यांची शस्त्रे पुन्हा परत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.