बेळगाव महानगरपालिकेकडून एपीएमसी येथे कचऱ्यापासून वीज निर्मिती करणारा शहरातील पहिला प्रकल्प तयार करण्यात आला असून सध्या वीज व नळ जोडणीच्या प्रतीक्षेत असलेल्या या प्रकल्पाद्वारे 1 किलो वॅट वीज निर्मिती केली जाणार आहे.
बेळगाव महापालिकेने कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती करणारे तीन प्रकल्प आधीच बेळगाव शहरात सुरू केले आहेत. यापैकी पहिला बायोगॅस प्रकल्प अझमनगर येथील इंदिरा कॅन्टीन येथे सुरू करण्यात आला आहे, तर अन्य दोन प्रकल्प गोवावेस येथील चंपाबाई भोगले शाळा आणि खासबाग येथील नाईट शेल्टर येथे सुरू करण्यात आला आहे.
सदर बायोगॅस प्रकल्पांमध्ये शिल्लक खाद्यपदार्थ तसेच जैविक कचऱ्याचा वापर करून गॅस तयार केला जातो, जो स्वयंपाकासाठी वापरला जातो. आता कचऱ्यापासून वीज निर्मिती करणारा प्रकल्प पहिल्यांदाच सुरू होत आहे.
शहरातील एपीएमसी येथे उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाच्या निर्मितीसाठी 1 कोटी 20 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. एपीएमसी तसेच शहरातील जैवविघटनशील कचऱ्यावर या प्रकल्पात प्रक्रिया केली जाईल.
सदर प्रकल्पासाठी दररोज 5 टन कचऱ्याची आवश्यकता भासणार असून तेवढा कचरा बेळगाव उपलब्ध असल्याचे महापालिका आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेचा वापर एपीएमसी परिसरातील एलईडी दिवे तसेच अन्य कारणांसाठी केला जाणार आहे. हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी सध्या वीज व नळ जोडणी हवी असून त्याची पूर्तता होताच त्यानंतर लगेचच हा प्रकल्प प्रारंभ केला जाणार आहे.