बेळगाव लाईव्ह : वायव्य कर्नाटक रस्ते परिवहन महामंडळाच्या तपास पथकाने जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीत विनातिकीट प्रवास करणाऱ्या १३,९५६ फुकट्या प्रवाशांना दणका दिला आहे.
परिवहन महामंडळाच्या महसुलाची गळती रोखण्यासाठी महामंडळाकडून मुख्य व विभागस्तरावर तपास पथके नेमण्यात आली असून या पथकांनी २०२३ मधील जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत ७१,०२१ प्रवाशांची तपासणी केली. यादरम्यान अधिकृत तिकिटाविना प्रवास करणारे १३,९५६ प्रवासी पथकाच्या तपासणीत दोषी आढळले आहेत. विनातिकिट प्रवाशांमुळे परिवहन महामंडळाचा १,४१,३९१ महसूल बुडाल्याचेही स्पष्ट झाले असून त्यांच्याकडून दंडात्मक कारवाई म्हणून एकूण १३.२४ लाख रुपये वसूल करण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सुरक्षित प्रवासी वाहतूक म्हणून प्राधान्य देण्यात येणाऱ्या राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांकडून विनातिकीट प्रवास केला जातो. यामुळे परिवहन महामंडळाला मोठा आर्थिक फटका सोसावा लागतो. हि बाब लक्षात घेऊन परिवहन ने हि कल्पना लढविली असून या माध्यमातून फुकट्या प्रवाशांना आळा तर बसणारच आहे शिवाय दंडात्मक कारवाईमुळे पुढील काळात अशा प्रकारांची संख्याही कमी होण्याची शक्यता आहे.
परिवहन महामंडळाच्या बसमधून अधिकृत तिकीटाविना प्रवास करणाऱ्यांना केंद्रीय मोटारवाहन कायद्यानुसार शिक्षेची तरतूद आहे. प्रवासातील तिकीट दराच्या दहापट किंवा जागीच ५०० रुपये दंड यापैकी एका शिक्षेस दोषी पात्र आहेत. वायव्य कर्नाटक रस्ते परिवहन महामंडळाच्या बेळगाव, धारवाड, बागलकोट, गदग, हावेरी व कारवार जिल्ह्यातील ५५ आगारातून दररोज ४,४४५ बस धावत असतात. यामधून दररोज १६ १७ लाख जण प्रवास करतात. मात्र यापैकी बरेच प्रवासी विनातिकीट प्रवास करण्यात माहीर असतात. अशांना परिवहनने चांगलाच चाप लावला असून भविष्यात बसमधून अधिकृत तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन परिवहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.