Sunday, December 29, 2024

/

राजहंस गडावर सुरक्षा रक्षक तैनात करण्याची मागणी

 belgaum

येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथील किल्ले राजहंस गड हा अलीकडच्या काळात पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. या गडावर शिवछत्रपतींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर तर पर्यटकांचा मोठ्या प्रमाणात वाढलेला ओघ लक्षात घेता प्रशासनाने गडावर सुरक्षा रक्षक नेमण्याची गरज निर्माण झाली आहे.

बेळगावच्या महत्त्वाच्या पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या येळ्ळूर येथील किल्ले राजहंस गडाचा गेल्या कांही वर्षात चांगला विकास साधण्यात आला आहे. रस्ता वगैरे करून पूर्वीच्या राजहंस गडाचा कायापालट करण्यात आल्यामुळे अलीकडच्या काळात हा गड बेळगाव शहर परिसरासह परराज्यातील पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. त्यामुळे हा गड पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे.

आता तर किल्ले राजहंसगडावर भव्य अशी छ. शिवाजी महाराजांची सिंहासनारूढ मूर्ती बसविण्यात आली आहे. त्यामुळे गडाचे सौंदर्य आणि भारदस्तपणामध्ये अधिकच वाढ झाली आहे. परिणामी या ठिकाणी पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे.

राजहंसगड किल्ल्यावरील श्री सिद्धेश्वर मंदिरातील दान पेटी चोरल्याची घटना रविवारी उघडकीस आली आहे. अज्ञातांनी सध्या गावातील नागरिक यात्रोत्सवात गुंतल्याचा फायदा घेत दान पेटी तोडून त्यातील रक्कम लंपास केली आहे.त्यामध्ये जवळपास 30 ते 40 हजार रूपये असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. दोन दिवसांपूर्वी गावात यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उत्सव काळात सर्व गावकरी यात्रा करण्यात दंग होते, त्याचबरोबर गडावरील पोलीस बंदोबस्त हटवून गावात तैनात करण्यात आला होता. याचा फायदा घेत अज्ञातानी दान पेटी तोडून त्यातील रक्कम हडप केली आहे.

पर्यटकांची दिवसेंदिवस वाढत चाललेली ही गर्दी लक्षात घेता त्यादृष्टीने गडावर पोलिसांची सुरक्षा व्यवस्था असणे जरुरीचे असून सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. खास करून सकाळी आणि सायंकाळच्या सत्रात पर्यटकांची गर्दी अधिक असते. शेकडो पर्यटक गड पाहण्यासाठी आणि गडावरील शिवरायांच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे प्रशासनाकडून जनहितार्थ तूर्तास राजहंसगडावर दिवसभर नसले तरी किमान दररोज सकाळी आणि सायंकाळी सुरक्षा रक्षक नियुक्त केले जावेत, असे शिवप्रेमींचे मत आहे.

तरी शहराच्या पोलीस आयुक्तांनी आणि बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन किल्ले राजहंसगडावर रात्रीच्या गस्तीसह सुरक्षा व्यवस्था तैनात करावी, अशी मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.