बेळगाव लाईव्ह : बेळगाव ग्रामीण मतदार संघातील कंग्राळी खुर्द येथील भरतेश प्रल्हाद जाधव या सुशिक्षित नवरदेवाने स्वतःच्या विवाह मुहूर्तपेक्षा मतदानाच्या मुहूर्ताला अधिक महत्व देत मतदानासंदर्भात लोकशाहीने दिलेल्या अधिकाराबाबत आदर व्यक्त केला.
कंग्राळी खुर्द येथील भरतेश जाधव या नवरदेवाने विवाहाला जाण्यापूर्वी ‘आधी लगीन कोंढाण्याचे..’ या तानाजी मालुसरेंच्या कर्तव्यनिष्ठेप्रमाणेच मतदानाला अधिक महत्व देत लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधी मतदानाचे कर्तव्य पार पाडत लोकशाहीप्रती कर्तव्यनिष्ठ दाखवून दिली आहे.
कंग्राळी खुर्द येथील मतदान केंद्रावर जाधव कुटुंबियांच्या वऱ्हाडी मंडळीने, नवरदेव, वरमाई आणि वरपित्यासह मतदानाचा हक्क बजावून सर्वांसमोर एक आदर्श उभा केला आहे.
मुंडावळ्या, फेटा, पोशाख परिधान केलेल्या या नवरदेवाने मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावून सर्वांसमोर मतदानाचे महत्व अधोरेखित केले आहे.
यावेळी संपूर्ण जाधव कुटुंबीयांनी नवरदेवाला शुभेच्छा दिल्या आणि उपस्थितातून नवरदेवाचे कौतुकही करण्यात आले.