बेळगाव लाईव्ह : राज्यात सत्ताबदल झाल्यामुळे बेळगाव नगरविकास प्राधिकरणाला नवा अध्यक्ष मिळणार आहे. यामुळे आता बुडा अध्यक्षपदासाठी काँग्रेस नेत्यांमध्ये आणखीन चुरस निर्माण झाली असून या पदासाठी राजू सेठ यांच्यासह सतीश जारकीहोळी समर्थकांच्या नावाचीही चर्चा आतापासूनच सुरु झाली आहे.
बुडाच्या अध्यक्षपदावर बेळगावमधील काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना संधी दिली जाणार आहे. त्यासाठी माजी मंत्री व प्रदेश कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या शिफारशीवरून अध्यक्ष नियुक्त केला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
२०१८ मध्ये राज्यात काँग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे आघाडी सरकार सत्तेत आले होते. त्यावेळी ‘बुडा’ अध्यक्षपदासाठी काँग्रेस व धजदचे स्थानिक नेते प्रयत्न करीत होते. त्यामुळे वाद टाळण्यासाठी त्यावेळी ‘बुडा’ अध्यक्ष निवड झालीच नाही. त्यानंतर साधारण वर्षभरानंतर २०१९ मध्ये राज्यात भाजपचे सरकार सत्तेत आले.
त्यावेळी मात्र मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांचे विश्वासू गुळप्पा होसमनी यांची ‘बुडा’च्या अध्यक्षपदी येडियुराप्पा यांच्या शिफारशीने नियुक्ती झाली. होसमनी यांचे नाव चर्चेत नसल्याने त्यांच्या निवडीमुळे स्थानिक भाजप नेत्यांमध्ये कुजबुज सुरु झाली. बहुचर्चित कणबर्गी निवासी योजनेसाठी होसमनी यांनी सर्वेक्षण केले. मात्र योजनेला मंजुरी मिळण्यापूर्वीच सप्टेंबर २०२१ मध्य त्यांची उचलबांगडी करून संजय बेळगावकर यांची बुडा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
संजय बेळगावकर यांच्या नियुक्तीनंतर शहरात अनेक बैठक आयोजिल्या गेल्या. मात्र प्रत्येक बैठकीला भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आणि बुडा सदस्यांनी अनुपस्थिती दर्शविली होती. कोरामभावी बैठक रद्द करण्याची वेळ आली.
यापूर्वी २०१३ साली सत्तेवर आलेल्या काँग्रेस पक्षाच्या सरकारच्या काळात सुरुवातीला बुडावर अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली नव्हती. सव्वा वर्ष उलटल्यानंतर युवराज कदम यांची निवड करण्यात आली. मात्र बेळगाव उत्तर विधानसभा मतदार संघाचे तत्कालीन आमदार फिरोज सेठ यांना विश्वासात न घेता हि निवड करण्यात आली त्यामुळे फिरोज सेठ यांनी नाराजी व्यक्त केली.
यानंतर अडीच वर्षे बुडाचे अध्यक्षपद युवराज कदम यांच्याकडे आणि त्यानंतरच्या कालावधीत फिरोज सेठ यांना ‘बुडा’चे अध्यक्षपद देण्यात आले. २०१८ साली विधानसभा निवडणूक जाहीर होईपर्यंत फिरोज सेठ हेच बुडाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत होते. आता राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यामुळे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना या पदावर संधी देण्यात येणार आहे. मात्र उत्तरचे नवनिर्वाचित आमदार राजू सेठ यांना या अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात येण्याची शक्यता कमी असून या पदासाठी केपीसीसी कार्याध्यक्ष आणि आमदार सतीश जारकीहोळी यांची शिफारस महत्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे.