बेळगाव लाईव्ह : कर्नाटकासह चार राज्यांमधील पोटनिवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने लागू केलेली आचारसंहिता मागे घेण्यात आली असून आता प्रलंबित कामे, योजना मार्गी लागण्याला गती मिळणार आहे.
कर्नाटकासह चार राज्यांमधील पोटनिवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने आचारसंहितेची घोषणा केली होती. २९ मार्चपासून मुख्य निवडणूक आयुक्तांनी कर्नाटक विधानसभेची, तसेच चार राज्यांमधील पोटनिवडणूक जाहीर केली होती.
त्याच दिवशी संपूर्ण कर्नाटकात निवडणूक आचारसंहिता लागू झाली होती, तर चार राज्यांमध्ये जेथे पोटनिवडणूक होती, त्या मतदारसंघांत आचारसंहिता लागू झाली होती. निवडणूक अधिसूचना १३ एप्रिलला निघाली तरी आचारसंहिता मात्र आधीच लागू झाली होती.
यामुळे विविध सभा, समारंभ, जयंत्या, उत्सव यावर निर्बंध लढण्यात आले होते. मात्र, आता आचारसंहिता हटविण्यात आली असून केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचे पत्र केंद्र शासनाच्या कॅबिनेट सचिवांना, कर्नाटकसह पाच राज्यांच्या मुख्य सचिवांना व मुख्य मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना पाठविले आहे. याबाबतची माहिती संबंधित सर्वांना दिली जावी, अशी सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाचे सचिव अश्वनीकुमार मोहल यांनी दिली आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणूक आणि देशातील चार राज्यांमधील लोकसभा तसेच विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी लागू केलेली आचारसंहिता संपली असून आता विविध विकासकामांना तसेच प्रलंबित असलेल्या योजना मार्गी लागणार आहेत. आचारसंहितेमुळे सर्व उत्सव व जयंत्या याशिवाय नव्या निविदा काढणे, नव्या कामांचा प्रारंभ करणे आदींवरही निर्बंध घातले होते.
आचारसंहितेमुळे बेळगाव महापालिकेची स्थायी समिती निवडणूक, सर्वसाधारण बैठक झाली नव्हती. आता या दोन्ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या दीड महिन्यापासून निवडणूक वगळता अन्य सर्व कामे ठप्प झाली होती. बेळगावची ऐतिहासिक शिवजयंती मिरवणूकही निवडणूक आचारसंहितेमुळेच लांबणीवर टाकली होती. आता आचारसंहिता संपल्यामुळे मिरवणूक, उत्सव व अन्य कामे हाती घेता येणार आहेत. शिवाय महापालिकेची, बुडाची अडकलेली काही महत्त्वाची कामालाही गती येणार आहे.
कर्नाटक व अन्य चार राज्यांमध्ये १० मे रोजी मतदान झाले, तर १३ मे रोजी मतमोजणी झाली. पण निवडणूक जाहीर झाली त्याचवेळी आचारसंहिता १५ मेपर्यंत राहणार असल्याचे निवडणूक आयुक्तांनी जाहीर केले होते. त्यानुसार आयोगानेच पत्र पाठवून आचारसंहिता संपल्याचे जाहीर केले आहे.