विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून महाराष्ट्राला लागून असलेल्या सीमेवर तसेच शहर आणि ग्रामीण भागात उभारण्यात आलेल्या चेकपोस्टवरील मनुष्यबळ मागे घेण्यात आले असून संबंधित अतिरिक्त चेकपोस्ट हटविण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध प्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र -कर्नाटक सीमेवर तसेच शहर व ग्रामीण भागात ठीकठिकाणी अतिरिक्त चेकपोस्ट उभारण्यात आले होते. मागील महिन्याभरापासून या चेकपोस्टवर अवैध वाहतुकीवर आळा घालण्याचे काम सुरू होते.
आचारसंहितेची घोषणा होताच राखीव पोलीस आणि इतर खात्यांचे अधिकारी या चेकपोस्टवर तळ ठोकून होते. मतदानाची तारीख जवळ येताच निमलष्करी दलाने या चेकपोस्ट्सचा ताबा घेतला होता. मात्र आता काल गुरुवारी संबंधित चेकपोस्टवरील मनुष्यबळ मागे घेण्यात आले असून साहित्यही हलविण्याचे काम सुरू होते.
सदर चेक पोस्टवर तैनात करण्यात आलेल्या निमलष्करी दलाच्या जवानांना गेल्या 9 मे रोजी माघारी घेण्यात आले. या जवानांना संवेदनशील आणि अति संवेदनशील मतदान केंद्राच्या सुरक्षेसाठी रवाना करण्यात आले होते. त्यानंतर मतदाना दिवशी 10 मे रोजी चेक पोस्टवर केवळ पोलीस आणि ‘क’ दर्जाचे अधिकारी थांबून होते. मात्र काल गुरुवारी त्यांना देखील माघारी बोलवण्यात आले आहे.
त्यामुळे काल सकाळपासून चेक पोस्टवर मनुष्यबळ नसल्याचे दिसून येत होते. त्याचप्रमाणे संबंधित चेक पोस्टच्या ठिकाणी असलेले खुर्च्या, टेबल वगैरे फर्निचर देखील हलविण्यात आले आहे. याखेरीज काल दुपारनंतर चेक पोस्टसाठी उभारण्यात आलेले शेड देखील काढण्याचे काम हाती घेण्यात आले होते.