स्मार्ट सिटी विभागाकडून शहरात राबविल्या जात असलेल्या बायसिकल शेअरिंग योजनेतील सायकलींचा वापर चक्क विधानसभा निवडणूक प्रचारासाठी केला जात आहे. ‘याना बाईक्स’ नावाच्या या बायसिकल शेअरिंग योजनेतील सायकली घेऊन लहान मुले निवडणूक प्रचारात सहभागी होत असून निवडणूक अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाल्याबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.
बेळगाव शहरातील एका विधानसभा मतदारसंघात गेल्या शनिवारी एका उमेदवाराच्या प्रचारामध्ये स्मार्ट सिटी योजनेतील सायकली घेऊन सहभागी झाली होती. या सायकलींवर बसून ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून प्रचार केला जात होता. त्याबाबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असले तरी स्मार्ट सिटी विभाग किंवा निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतलेली नाही.
यासंदर्भात स्मार्ट सिटी विभागाच्या बायसिकल शेअरिंग योजनेच्या प्रमुखांची संपर्क साधला असता स्मार्ट सिटी योजनेतील सेवा आपण बंद केल्याची माहिती त्यांनी दिली. आता निवडणूक रिंगणातील उमेदवारांनी शक्कल लढवून या सायकलींचा वापर प्रचारासाठी सुरू केला आहे. त्यामुळे आता निवडणूक विभाग व स्मार्ट सिटी विभाग याविषयी कोणता निर्णय घेणार? हे पहावे लागणार आहे. रीतसर भाडे भरून या सायकलिंगचा वापर होत असेल तर संबंधित ठेकेदाराला त्याचा फायदा होईल. तथापि लहान मुलांकडून प्रचारासाठी या सायकलींचा वापर झाल्याने ठेकेदार अडचणीत येऊ शकतो.
बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने गेल्या डिसेंबर महिन्यात याना बाईक्स या नावाने बायसिकल शेअरिंग योजना सुरू केली. या योजनेतून शहरात सायकली थांबविण्यासाठी डॉकयार्ड तयार केले आहेत.
तेथे सायकली उपलब्ध करून दिल्या आहेत. याना बाईक्स या नावाचे मोबाईल ॲप डाऊनलोड करून घेऊन त्या माध्यमातून सदर सायकलींचा वापर करता येतो. प्रारंभी या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र गेल्या महिन्याभरापासून या सायकलींचा वापर वाढला आहे.