मतदान केंद्रावरील गर्दीचा अंदाज यावा, मोठ्या रांगा पाहून माघारी परतणाऱ्या मतदारांची सोय व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने ‘क्यू स्टेटस’ हे ॲप्लिकेशन राज्यातील सर्व मतदान केंद्रासाठी कार्यान्वित केले आहे. मतदान केंद्रांवर मतदारांची किती गर्दी आहे हे या स्टेटस वरून समजणार आहे.
निवडणूक आयोगाच्या वॉटर हेल्पलाइन ॲपवर मतदान केंद्रावर असलेल्या गर्दीच्या रांगेची माहिती मिळणार आहे. पूर्वी प्रायोगिक तत्त्वावर बेंगलोर, म्हैसूर, मंगळूर, हुबळी -धारवाड या शहरासाठी सुरू केलेले क्यू स्टेटस एप्लीकेशन आता राज्यातील सर्व मतदार केंद्रांसाठी कार्यान्वित झाले आहे. सर्वप्रथम 2018 साली विधानसभा निवडणुकीमध्ये बेंगलोर येथे सर्वात कमी 55 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे मतदारांना मतदानासाठी आकर्षित करण्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालय आणि बृहन बेंगलोर महापालिकेकडून हे एप्लीकेशन तयार करण्यात आले होते. आता ते सर्व राज्यात कार्यान्वित झाले असून या एप्लीकेशनवर माहिती अपडेट करण्याची जबाबदारी पोलिसांवर असणार आहे.
मतदान केंद्रावर गेल्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या मोठ्या रांगा पाहून उन्हात रांगेत थांबावे लागणार या चिंतेने मतदार नाराज होतात. अनेक वेळा मोठ्या रांगा पाहून मतदार माघारी फिरतात. गर्दी कमी झाली की जाऊ, असे मतदारांना वाटते आणि इतर कामांच्या व्यापात काहींचे मतदान करणे राहून जाते.
मात्र आता निवडणूक आयोगाच्या वॉटर हेल्पलाइन ॲपवर ‘क्यू स्टेटस’ उपलब्ध असेल. आपल्या मोबाईलवर हे ॲप डाऊनलोड करून मतदान केंद्राचा क्रमांक घातल्यानंतर त्या ठिकाणी किती गर्दी आहे हे मतदारांना समजणार आहे. दर 15 मिनिटाला मतदान केंद्रावरील गर्दीची माहिती या एप्लीकेशनवर अपलोड केली जाणार आहे.