Monday, November 18, 2024

/

बससेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांची गैरसोय

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव आगारामध्ये लांब पल्ल्याच्या बससह ग्रामीण भाग व स्थानिक बस सेवा विस्कळीत झाली आहे. राज्यातील सुमारे एक हजार बस निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यामुळे संपूर्ण राज्यासह जिल्ह्याची देखील बस सेवा विस्कळीत झाली आहे.

ग्रामीण भागातील अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी यंदा परिवहन महामंडळाने राज्यातून चार हजारावर बस दिल्या आहेत. आगारात निम्म्या बस नसल्याने ग्रामीण भागातील काही बस रद्द केल्या आहेत. यामुळे वाहतूक सेवेवर परिणाम झाला आहे.

बससंदर्भात चौकशी करण्यासाठी परिवहन मंडळाच्या कार्यालयात संपर्क साधला असता निकालापर्यंत बस सेवा विस्कळीत होणार असून मिळेल त्या बसने प्रवास करण्याचा सल्ला प्रवाशांना दिला जात आहे. बेळगाव जिल्ह्यात ४२ बस निवडणुकीच्या कामासाठी वापरण्यात येत आहेत. त्याशिवाय निवडणूक कामात व्यस्त असलेल्या कर्मचाऱ्यांना पहाटेपासून मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी देखील शंभरहून अधिक बस तैनात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील बस फेऱ्यांत घट केली आहे. लांब पल्ल्याच्या बस फेऱ्या देखील कमी करण्यात आल्या असून मोजक्याच बस प्रवाशांना घेऊन धावत असल्याचे चित्र बेळगाव आगारात पहावयास मिळत आहे. उपनगरात व आजूबाजूच्या गावामध्ये धावणाऱ्या बस देखील कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना बसच्या प्रतिक्षेत ताटकळत आगारात उभे राहावे लागत आहे.

बस नसल्याने प्रवासी बराच वेळ स्थानकात बसच्या प्रतीक्षेत उन्हातच उभे राहिल्याचे दिसून येत असून बेळगावसह ग्रामीण भागातील मुक्कामाच्या गाड्या रद्द केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. निवडणुकीसाठी बस गेल्याने आगारातील बसची संख्या कमी झाली असून ग्रामीण भागातील कमी उत्पन्न मिळण्यासह अन्य ठिकाणच्या बसेस रद्द केल्या आहेत.

सुट्टी असल्यामुळे प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ध्वनिक्षेपकाव्दारे कोणत्या बसेस रद्द केल्या आहेत. त्याची सूचना दिली जात आहे. निवडणुकीनंतर बंद असलेल्या बस पुन्हा सुरू करून प्रवाशांची सोय केली जाईल, यामुळे दोन दिवस प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.