कर्नाटक विधानसभा निवडणूक पारदर्शक होण्यासाठी निवडणूक आयोगाने आता सीमावर्तीय भागावर लक्ष केंद्रित केले असून कर्नाटकाला लागून असलेल्या सहा राज्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. पैसे, भेटवस्तू, अंमली पदार्थ निवडणूक काळात या सर्व राज्यातून कर्नाटकात जाऊ नयेत याची खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली आहे.
निवडणुकीच्या निमित्ताने सीमेवरून मोठ्या प्रमाणात पैसे आणि भेट वस्तूंची ने -आण होण्याची शक्यता असल्याने कर्नाटक राज्याला लागून असलेल्या सहा राज्यांनी आपल्या राज्यातील सर्व चेक पोस्टवर खबरदारी घ्यावी. कर्नाटकातील निवडणुकीचा कोणताही गैरव्यवहार आपल्या सीमावर्तीय भागामध्ये होऊ नये याची काळजी घ्यावी, अशी सूचना सर्व राज्यांना करण्यात आली आहे.
भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी कर्नाटकाला लागून असलेल्या सहा राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली असून सीमावर्तीय भागात अधिक लक्ष केंद्रित करण्यास बजावले आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत निवडणुका अधिकाऱ्यांनी 83 कोटी रुपये रोख रक्कम चेक पोस्टवर जप्त केली होती. यंदा 305 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. कर्नाटकाला महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू आणि गोवा राज्यांची सीमा लागून आहे.
या राज्यांच्या सीमेवरील चेक पोस्टची संख्या पुढील प्रमाणे आहे. आंध्रप्रदेश -57, महाराष्ट्र -53 तामिळनाडू -25, तेलंगणा -24, केरळ -21 आणि गोवा -5. सीमावर्तीय भागाला लागून असलेल्या कर्नाटकातील विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आपल्या शेजारील राज्यांच्या भागाचा वापर करण्याची शक्यता असल्यामुळे संबंधित सर्व भागांवर देखील नजर ठेवली जाणार आहे.