बेळगाव लाईव्ह : पाठ्यपुस्तकाची छपाई न होणे, निविदा मंजूर न होणे, अधिकृत आकडेवारी न मिळणे, छपाईसाठी पेपर उपलब्ध न होणे या कारणामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तीन महिने उलटले तरी नवीन पाठ्यपुस्तके मिळत नव्हती.
त्यामुळे जुन्याच पुस्तकांवर शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत होती. मात्र यंदा खासगी विनाअनुदानित व सरकारी शाळांमध्ये पाठ्यपुस्तके उपलब्ध करुन देण्यासाठी शिक्षण खात्याने कंबर कसली आहे.
शिक्षण खात्याने यंदा आपल्या कारभारात सुधारणा केली असून यंदा विद्यार्थ्यांना शाळेच्या
पहिल्या दिवशीच नवीन पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. शिक्षण खात्याने मागणीप्रमाणे पाठ्यपुस्तके छपाईवर भर दिला होता.
आतापर्यंत ९५ टक्के पाठ्यपुस्तकांचा साठा उपलब्ध झाला असून केवळ ५ टक्के पाठ्यपुस्तके येणे बाकी आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके मिळणार आहेत अशी माहिती पाठ्यपुस्तक वितरण अधिकारी सी. मुदनकनगौडर यांनी दिली आहे.
सरकारी, विनाअनुदानित, अनुदानित खासगी शाळांना मिळून ६ लाख १ हजार ६२ पाठ्यपुस्तकांची आवश्यकता आहे. त्यापैकी ५ लाख ९७ हजार ४७० पाठ्यपुस्तके बेळगावात दाखल झाली आहेत. आतापर्यंत ५ लाख १ हजार ८८८ पाठ्यपुस्तकांचे वितरण झाले आहेत. केवळ ५ टक्के पाठ्यपुस्तकांचे वितरण बाकी आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात २,३९० शाळा असून २ लाख १४ हजार ३६५ विद्यार्थी पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण घेत आहेत. चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात ३, ०४० शाळा असून ४ लाख ५५ हजार ७७७ विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. दोन्ही शैक्षणिक जिल्ह्यात मिळून ५,४३० शाळा आहेत. त्यामध्ये ६ लाख ७० हजार १४२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. उन्हाळी सुट्टीपूर्वी शाळांमधून विद्यार्थ्यांकडून जुन्या पाठ्यपुस्तकाचे संकलन करुन ठेवण्यात आले आहे. शिक्षण खात्याचा दरवर्षीचा अनुभव पाहता पाठ्यपुस्तकाअभावी विद्यार्थ्यांची होणारी अडचण लक्षात घेऊन शिक्षकांनी पूर्वतयारी केली आहे. मात्र, यंदा शाळा सुट्टी पडण्यापूर्वी नवीन पाठ्यपुस्तके शाळांमधून वितरण करण्यात आली आहेत.
यंदा सरकारी व खासगी शाळांमधून मागणीप्रमाणे पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे. सरकारी, अनुदानित शाळांमधून ३ लाख १६ हजार ५६६ पुस्तकांची मागणी होती. त्यापैकी २ लाख ९७ हजार २३५ पाठ्यपुस्तके पुरविण्यात आली आहेत. खासगी
शाळांमधून २ लाख ८४ हजार ४९६ पाठ्यपुस्तकांपैकी २ लाख ४ हजार ६२५ पाठ्यपुस्तकांचे वितरण झाले आहे. अजून ३ हजार ५९२ पाठ्यपुस्तके उपलब्ध होणे गरजेचे आहे. शिक्षण खात्याने केलेल्या तयारीनुसार उर्वरित ५ टक्के पुस्तकांचा साठाही लवकरच उपलब्ध होईल आणि विद्यार्थ्यांना यंदा पहिल्याच दिवशी नवी पाठ्यपुस्तके उपलब्ध होतील.