सालाबाद प्रमाणे सेवा समिती बेळगावतर्फे उन्हाळ्यात तहानलेल्यांना मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणारा पाणपोईचा स्तुत्य उपक्रम यंदाही मध्यवर्ती बस स्थानकाच्या ठिकाणी यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे.
सेवा समिती बेळगावतर्फे गेल्या 8 वर्षांपासून बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकाच्या ठिकाणी उन्हाळ्यात तीन महिने पाणपोई उघडण्यात येते. या पाणपोईच्या माध्यमातून तहानलेल्या प्रवासी व नागरिकांना रखरखत्या उन्हात दिलासा देणारे थंडगार पिण्याचे पाणी मोफत उपलब्ध करून दिले जाते.
हा सेवाभावी उपक्रम असल्यामुळे बस स्थानकाच्या ठिकाणी पाणपोई उघडल्याबद्दल सेवा समितीकडून केएसआरटीसी देखील कोणतेही शुल्क आकारत नाही.
बस स्थानकाच्या ठिकाणी काउंटर उभारून मध्यम आकाराच्या छोट्या चावीच्या पाण्याच्या टाक्यांमधून प्रवासी आणि नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाते.
या मोफत पाणपोईला दरवर्षी उत्तम प्रतिसाद मिळतो. सध्या उन्हाळ्यात जवळपास 100 ते 200 पाण्याच्या टाक्या रिकाम्या होत असतात. सेवा समिती बेळगावतर्फे राबविण्यात येणारा हा उपक्रम दरवर्षी प्रवाशांच्या प्रशंसेस पात्र ठरत असतो.