बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणूक तिकीट वाटपानंतर नाराज झालेल्या इच्छुकांनी, कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी काँग्रेसमध्ये विविध पक्षातून प्रवेश घेतला.
काँग्रेस प्रवेश केलेल्या नेत्यांना उमेदवारी देखील जाहीर झाली. मात्र यापैकी काहींनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला तर काहींनी पराभव. भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेले जगदीश शेट्टर आणि लक्ष्मण सवदी या दिग्गज नेत्यांपैकी शेट्टर यांचा पराभव झाला. यानंतर आज उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
यासंदर्भात बेळगाव सर्किट हाऊस येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना डी. के. शिवकुमार म्हणाले, वेगवेगळ्या पक्षांतून येऊन काँग्रेसला ताकद देणारे जिंकले किंवा हरले तरी ते आमचे नेते आहेत,भाजप आणि जेडीएस सोडून काँग्रेसमध्ये आलेल्या नेत्यांमुळे काँग्रेस पक्षाला बळकटी मिळाली आणि राज्यात काँग्रेस सरकार स्थापन झाले.
निवडणुकीनंतर विधिमंडळ बैठक, शपथविधी आणि मंत्रिमंडळ रचनेच्या दबावामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. काँग्रेसमध्ये पराभूत झालेले अनेकजण आहेत. त्यांना सक्षम करणे आपले कर्तव्य आहे, असे डीकेशींनी सांगितले.
डीकेशी पुढे म्हणले, पराभूत झालेल्यांपैकी, पक्ष सोडून आमदार झालेल्यांपैकी कोणीही मंत्रीपदाची मागणी केलेली नाही. मंत्रिमंडळाची निवड झाली असून उर्वरित सगळ्यांना पक्षात योग्य स्थान दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी मंत्री सतीश जारकीहोळी, लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार बाबासाहेब पाटील, महेश तम्मनवर, विश्वास वैद्य, चन्नराज हट्टीहोळी, आसिफ सेठ आदी उपस्थित होते.