बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभेत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असून आता लवकरच काँग्रेस सत्ता स्थापन करणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे मुख्यमंत्र्यांचे नाव घोषित करणार असून काँग्रेससमोर डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यापैकी एका नेत्याची निवड करण्याचा पेच उभारला आहे.
कर्नाटकातील सर्व नवनिर्वाचित काँग्रेस आमदारांनी रविवारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या (सीएलपी) बैठकीसाठी बेंगळुरू येथील एका हॉटेलमध्ये बैठक घेतली. दीड वाजेपर्यंत ही बैठक चालली आणि त्यात सिद्धरामय्या, डीके शिवकुमार, केसी वेणुगोपाल आणि जयराम रमेश यांसारखे नेते उपस्थित होते. यांच्यासह महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि पक्षाचे नेते जितेंद्र सिंह तसेच दीपक बाबरिया या बैठकीत निरीक्षक म्हणून उपस्थित होते.
सीएलपीच्या बैठकीदरम्यान, सर्व आमदारांनी काँग्रेस अध्यक्ष मलिकार्जुन खर्गे यांना एका ओळीच्या ठरावात कर्नाटकचा पुढील मुख्यमंत्री निवडण्यासाठी एकमताने अधिकृत केले असून आज कर्नाटकाच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा करण्यासाठी दिल्ली हाय कमांड कडे चर्चा करण्यासाठी रवाना झाले आहेत.त्यांच्या सोबत आमदार जमीर अहमद यांनीही दिल्ली प्रवास केला आहे.