बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघाची मतमोजणी राणी पार्वतीदेवी महाविद्यालयात होत आहे.
बॅलेट मतमोजणीला सकाळी ७ वाजता सुरुवात झाली असून मुख्य मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली आहे. फेरीनिहाय मतदानाची आकडेवारी प्रसारित करण्यासाठी पत्रकारांना मीडिया सेंटरच्या माध्यमातून स्क्रीनद्वारे माहिती पुरविण्यात येत आहे.
शुक्रवारी सायंकाळीच बेळगाव जिल्ह्यात १४४ कलम जारी करण्यात आला असून मतमोजणी केंद्राजवळ चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सकाळी ८ पासूनच मतमोजणी केंद्राबाहेर समर्थक-कार्यकर्त्यांची उपस्थिती दिसून येत असून हळूहळू गर्दी वाढत चालली आहे.
मतमोजणीच्या आकडेवारीची घोषणा ध्वनिक्षेपकाद्वारे करण्यात येणार असून फेरीनिहाय पडलेल्या मतांची आकडेवारी https://results.eci.gov.in/ या संकेतस्थळावर लाईव्ह पाहण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सर्वप्रथम पोस्टल मतपत्रिका आणि घरातून केलेल्या मतांची मोजणी केली जाईल. त्यानंतर मतमोजणी यंत्राद्वारे झालेल्या मतांची मोजणी होईल.
पोस्टल मतदानात विद्यमान आमदारांची आघाडी
बेळगाव लाईव्ह : आरपीडी महाविद्यालयात सुरु झालेल्या मतमोजणीत पोस्टल मतदानाची मोजणी करण्यात येत असून या मतमोजणीत बेळगाव जिल्ह्यात विविध मतदार संघात विद्यमान आमदारपद भूषवित असलेल्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे.
यमकनमर्डी मतदार संघातून सतीश जारकीहोळी, खानापूर मतदार संघातून अंजली निंबाळकर, ग्रामीण मतदार संघातून लक्ष्मी हेब्बाळकर, गोकाक मतदार संघातून रमेश जारकीहोळी तर निपाणी मतदार संघातून शशिकला जोल्ले आघाडीवर आहेत. आरपीडी महाविद्यालयात सुरु असलेल्या मतमोजणी केंद्राबाहेर समर्थकांची गर्दी वाढत चालली असून कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतमोजणी पुढे सरकत आहे.
दक्षिण मतदार संघात मतांची चुरस
बेळगाव लाईव्ह : दक्षिण विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणीच्या पहिल्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या असून अभय पाटील आणि रमाकांत कोंडुसकर यांच्यात मतांची चुरस पाहायला मिळत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत अभय पाटील हे आघाडीवर आहेत तर दुसऱ्या क्रमांकावर रमाकांत कोंडुसकर आहेत. अभय पाटील यांना पहिल्या फेरीत ३९४४ तर दुसऱ्या फेरीत ७६२१ आणि रमाकांत कोंडुसकर यांना पहिल्या फेरीत २०६७ तर दुसऱ्या फेरीत ४३२५ मते पडली आहेत.