सांबरा गावच्या पूर्व भागात सलग दोन दिवस वीज पुरवठा खंडित होऊन सर्व बोअरवेल बंद पडल्यामुळे गावकऱ्यांची पाण्याविना होणारी गैरसोय दूर करण्याचे स्तुत्य कार्य गावातील नवज्योती युवक मंडळांने केल्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांची गावात प्रशंसा होत आहे.
सोसाट्याच्या वाऱ्यासह वळीव पावसाने झोडपल्याने सांबरा पूर्व भागात अनेक ठिकाणी झाडे आणि झाडांच्या फांद्या विजेच्या तारांवर पडून वीज पुरवठा खंडित झाला आहे.
गेल्या दोन दिवसापासून खंडित झालेला हा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी हेस्कॉमचे कर्मचारी परिश्रम घेत असते तरी त्यांना अद्याप यश आलेले नाही. सांबरा पूर्व भागातील गावकरी पाण्याकरिता बोअरवेलवर अवलंबून आहेत. मात्र आता दोन दिवस वीजपुरवठा नसल्यामुळे या बोअरवेल बंद पडल्या असून गावकऱ्यांची पाण्याविना कुचंबना होत होती.
सदर गैरसोय निदर्शनास येताच गावातील शुक्रवार पेठ येथील नवज्योती युवक मंडळाचे कार्यकर्ते गावकऱ्यांच्या मदतीला धावले आहेत. त्यांनी तातडीने जनरेटर आणून बोअरवेल सुरू करण्याद्वारे लोकांना पाणी उपलब्ध करून दिले.
यासाठी कार्यकर्त्यांनी यल्लांना सुळेभावी यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना विनंती करून त्यांच्या शेतातील जनरेटर गावात आणून बोअरवेलच्या ठिकाणी बसविले.
या पद्धतीने नवज्योती युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पाण्याची सोय करून दिल्याबद्दल गावकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून ते त्यांची प्रशंसा करताना दिसत आहेत.