गांधीनगर नजीकच्या जय किसान होलसेल भाजी मार्केटमुळे सरकारच्या एपीएमसी मार्केट यार्डातील भाजी मार्केटला अवकळा प्राप्त झाली आहे. मात्र कर्नाटकात आता भाजपला धूळ चारून काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आल्यामुळे, झालेल्या या सत्तापालटामुळे एपीएमसी भाजी मार्केटला यापुढे चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
गांधीनगरजवळ जय किसान होलसेल भाजी मार्केट सुरू झाल्यापासून बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेच्या अर्थात एपीएमसीच्या भाजी मार्केटला अवकळा प्राप्त झाली आहे. जय किसान भाजी मार्केट राष्ट्रीय महामार्गानजिक असल्यामुळे त्या ठिकाणी ग्राहक मोठ्या प्रमाणात वळतात. परिणामी बहुतांश व्यापाऱ्यांनी देखील जय किसानकडे आपला मोर्चा वळविला आहे.
या परिस्थितीमुळे एपीएमसी मधील कांदे, बटाटे, रताळी मार्केट वगळता अन्य भाजीपाला मार्केटला अवकळा प्राप्त झाली आहे. गांधीनगर जवळ जय किसान होलसेल भाजी मार्केटची उभारणी करण्यासाठी संबंधितांना तत्कालीन भाजप सरकारची साथ लाभल्याचा आरोप आहे. मात्र त्या मार्केटमुळे एपीएमसीतील भाजी मार्केट कोलमडले. परिणामी जय किसान भाजी मार्केट अनाधिकृत असल्याचा दावा करत एपीएमसी मधील गाळेधारकांनी महिनाभर आंदोलन छेडले. त्याला काँग्रेस, निधर्मी जनता दल आणि महाराष्ट्र एकीकरण समितीने साथ दिली.
एपीएमसी मधील व्यापाऱ्यांनी आंदोलन छेडताच काँग्रेसचे यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी आणि बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवताना एपीएमसी भाजी मार्केटला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्याचे आश्वासन त्यावेळी दिले होते. आता काँग्रेसचे सरकार राज्यात सत्तेवर आले असल्याने एपीएमसी मधील व्यापाऱ्यांच्या अशा पल्लवी झाल्या आहेत. त्या अनुषंगाने येत्या काही दिवसात एपीएमसी भाजी मार्केट पुन्हा पूर्ववत सुरू करण्यासाठी व्यापाऱ्यांच्या हालचाली वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यामुळे जय किसान होलसेल भाजी मार्केटमध्ये देखील चर्चेला उधाण आले आहे. जय किसान भाजी मार्केट यापूर्वी बऱ्याचदा वादाचा मुद्दा बनले आहे.
मात्र या भाजी मार्केटसाठी बेळगाव दक्षिणच्या आमदारांनी पुढाकार घेतला होता. त्यामुळे या मार्केटला भाजप पुरस्कृत असा शिक्का बसला आहे. तथापि आता सरकारच्या सत्तांतरामुळे एपीएमसी भाजी मार्केट पुन्हा पूर्ववत जोमाने सुरू होईल, असा विश्वास व्यापाऱ्यांसह दलाल व शेतकरीच नव्हे तर चक्क हमालवर्गात व्यक्त होत आहे.