बेळगाव लाईव्ह : मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आज राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि आणि जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधत पावसाळा, अतिवृष्टी आणि संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या खबरदारीच्या उपाययोजनांबाबत सूचना दिल्या.
पावसाळा सुरू होत असल्याने राज्यात अतिवृष्टी व पुराच्या स्थितीत पिकांच्या नुकसानीची स्पष्ट माहिती संबंधित जिल्हा आयुक्तांनी तातडीने मिळवावी. शेतकऱ्यांना दर्जेदार पेरणी बियाणे, खते आणि कीटकनाशके वेळेत पुरविण्यात यावीत, पूर व्यवस्थापनात बेजबाबदारपणा किंवा कर्तव्यात कसूर आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिला.
पूरप्रवण क्षेत्रे ओळखून आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना करण्यात याव्यात, शाळा इमारत व पूल मोडकळीस आले असतील तर याठिकाणी कोणत्याही प्रकारची आपत्ती होऊ नये यासाठी कार्यवाही करावी, नुकत्याच झालेल्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांची तातडीने भरपाई द्यावी, जीवितहानी टाळण्यासाठी जी काही कृती आवश्यक असेल ती तातडीने करावी. खबरदारी न घेतल्यास जीवितहानी होईल त्यामुळे जीवितहानी टाळण्यासाठी कारवाई करावी, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करून प्रत्यक्ष परिस्थितीच्या आधारे आवश्यक पावले उचलावीत, अशा सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिल्या.
याचप्रमाणे उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांनीही महत्वपूर्ण सूचना देत नव्या सरकारकडून जनतेला असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शासनाचे सर्व कार्यक्रम पुरेशा प्रमाणात पोहोचविण्याचे काम अधिकाऱ्यांनी करावे, असे सांगितले.
या बैठकीत जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आल्याचे स्पष्ट केले. याचप्रमाणे शेतकऱ्यांना आवश्यक पेरणी, बियाणे आणि कीटकनाशकांचे वाटप लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांच्यासह कृषी, फलोत्पादन, पाटबंधारे, अन्न, आरोग्य, पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम यासह विविध विभागांचे जिल्हास्तरीय अधिकारी सहभागी झाले होते.