महाराष्ट्र एकीकरण समिती ही उचापती लोकांची संघटना असून आम्ही त्यांचा लवकरच बंदोबस्त करू अशी दर्पोक्ती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली आहे.
हुबळी येथे भाजप उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी आले असता प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. बेळगावातील राजकीय घडामोडींवर बोलताना महाराष्ट्र एकीकरण समिती बाबत बोम्मई यांची जीभ घसरली. समितीला त्यांनी थेट उचापतीची संघटना म्हणून संबोधले.
एवढावरच ते न थांबता बेळगाव येथील जनताच समितीला पाच वर्षे घरी बसवेल असे सांगितले. निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समिती लोकांचे माथे बिघडवण्याचे काम करत आहे. बेळगावच्या जनतेलाही ते ठाऊक असून तेथील लोकच त्यांना उत्तर देतील असे मुख्यमंत्री बोम्मई पुढे म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रीय पक्षांच्या प्रचारासाठी कर्नाटकातील नेत्यांकडून बेळगाव मध्ये महाराष्ट्रातील नेत्यांना बोलावले जात आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात प्रचारासाठी येणाऱ्या या नेत्यांना काळे झेंडे दाखवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सध्या राष्ट्रीय पक्षांची देखील प्रचारासाठी कोंडी झाली आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती पुन्हा एकदा वरचढ ठरू लागल्याने मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना देखील त्याची दखल घ्यावी लागली आहे. त्यामुळेच त्यांनी हुबळी येथे महाराष्ट्र एकीकरण समिती विरोधात आग पाखड केली.
विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की, पंतप्रधान खेडेगावांपर्यंत पोहोचू नये. त्यांनी दिल्लीतच राहावे, अशी सिद्धरामय्या यांची भावना आहे. काँग्रेसला बदल आवडत नाही. राज्यातील जनता संकटात सापडलेली असताना पंतप्रधान मोदी यांनीच राज्याला मोठी आर्थिक मदत देऊ केली आहे. सिद्धरामय्या मुख्यमंत्री असताना राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले होते असे सांगून त्यावेळी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे राज्यात आले होते का? असा सवाल बोम्मई यांनी केला.
पत्रकारांनी बी. एल. संतोष यांच्या लिंगायत मता बाबत केलेल्या वक्तव्याबाबत छेडले असता. त्याबद्दल आता काहीच बोलणे नको म्हणत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अधिक बोलणे टाळले.