यंदाची विधानसभा निवडणूक महापालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरली असून पालिकेच्या 10 अधिकाऱ्यांची वाहन सुविधा या निवडणुकीमुळे काढून घेण्यात आली आहे. त्यांची वाहने निवडणुकांसाठी वापरली जात आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी बेळगाव महापालिकेतील 10 अधिकाऱ्यांची वाहने तात्पुरती काढून घेण्यात आली आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना गेल्या महिन्याभरापासून महापालिकेत किंवा अन्य कार्यालयीन कामासाठी जाताना स्वतःचे वाहन वापरावे लागत आहे. निवडणूक कामासाठी घेतलेल्या संबंधित 10 वाहनांना जीपीआरएस यंत्रणा बसवली आहे. त्यामुळे एक तर निवडणूक कामासाठी त्या वाहनाचा वापर केला जात आहे अन्यथा अधिकाऱ्यांना वापरण्यास न देता महापालिकेच्या आवारात ती वाहने थांबून ठेवली जात आहेत.
महापालिकेतील अधिकाऱ्यांसाठी भाडेतत्त्वावरील वाहने वापरली जातात. ठेकेदारांकडून या वाहनांचा पुरवठा केला जातो. महापालिकेने 15 हून अधिक वाहने भाडेकरारने घेतली आहेत. त्यातील 10 वाहने सध्या अधिकाऱ्यांकडे नाहीत. वाहनांना जीपीआरएस लावल्याने ती कोठे जातात याची माहिती निवडणूक विभागाला मिळते. त्यामुळे निवडणूक विभागाची नजर चुकवून त्या वाहनांचा वापर करणे देखील अधिकाऱ्यांना शक्य नाही. एकंदर परिस्थिती पाहता 15 मे नंतरच ती वाहने अधिकाऱ्यांना मिळणार आहेत. तोवर त्यांना स्वतःचेच वाहन वापरावे लागणार आहे.