शिष्य : गुरुजी, बरेच दिवस आपला संवादच नाही! तीर्थाटनाला तुम्ही गेला कि काय अशा विवंचनेत मी होतो.
गुरुजी : नाही वत्सा.. मी आता ह्यावेळी कसा जाईन तीर्थाटनाला…?मी पूर्ण मतदार संघात फिरत होतो. कुठं कुठं काय चाललंय? लोकांच्या मनात काय चाललाय? आणि एकंदर स्थिती-गती-परिस्थिती याचा विचार करत होतो.
शिष्य : गुरुजी काय वाटतंय तुम्हाला एकंदर? कसं होईल?
गुरुजी : १० तारखेनंतरची स्थिती मात्र नक्कीच वेगळी असणार आहे बघ वत्सा…! दक्षिण, उत्तर, ग्रामीण, झाडांचं गाव.. या सगळ्या ठिकाणी एक माहोल तयार झालाय. लोक संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहेत, असं चित्र पहिल्यांदाच निर्माण झालंय..
शिष्य : याचं कारण काय गुरुजी?
गुरुजी : यावेळी जे उमेदवार दिलेले आहेत ते लोकांच्यातून दिलेले आहेत. कुणीही लादलेले उमेदवार नाहीत. आतापर्यंत नेते उमेदवार देत होते. मात्र आता जनतेनेच उमेदवार निवडले आहेत. आणि ज्यावेळी जनता लढायला रस्त्यावर उतरते त्यावेळी जनतेला हरवणं खूप अवघड असतं.
शिष्य : गुरुजी तुम्ही हे अतिउत्साहाने तुम्ही बोलताय असं मला वाटतंय! माझं कागदावरच गणित बघितलं कि आपण पिछाडीवर आहे असं दिसतंय.
गुरुजी : वत्सा, जेव्हा एक अधिक एक बरोबर दोन असं गणित ज्यावेळी असतं त्यावेळी ते कागदावरचं गणित असतं. कागदावरचं गणित कागदावरून समजत नाही. कागदाचं गणित मनातून यावं लागत आणि मनातलं गणित ज्यावेळी कागदावर येत त्यावेळी वेगळीच स्थिती निर्माण होते. आणि त्या स्थितीचा आढावा घ्यायचा असेल तर जनमानसाचा कौल घेतला पाहिजे तरच तुला ती स्थिती काळे.
शिष्य : गुरुजी अशी काय परिस्थिती निर्माण झाले कि लोकांना असं वाटू लागलंय कि आज आपला माणूस आला पाहिजे. आपल्या झेंड्याचा माणूस आला पाहिजे.
गुरुजी : हि एका दिवसाची प्रक्रिया नसते वत्सा.. अनेक दिवस, अनेक वर्षे, काळ जावा लागतो. लोकांच्या अत्याचाराची ज्यावेळी परिसीमा होते त्यावेळी लोक स्वतःच्या मनाने असा विचार करू लागतात कि यातून मला मुक्ती हवी आहे. यातून मला बाहेर पडलं पाहिजे. माझा स्वाभिमान, स्वत्व मला शोधलं पाहिजे. आणि या स्वत्वाचा हुंकार म्हणजे यावेळचा जनमानसाचा कौल आहे.
शिष्य : मग गुरुजी तुम्ही म्हणताय तसं सर्वच ठिकाणी आपण यशस्वी होऊ?
गुरुजी : यशस्विता केवळ विजयातच असते असे नाही. आपण किती टक्क्यांनी पुढे जातो यातही यशस्विता सामावलेली असते. मराठी माणूस एक झाला आहे. विरोधी पक्षात गेलेली माणसे सुद्धा परत येत आहेत. आणि ज्यावेळी आपलं झाड गजबजलेलं असतं, त्यावेळी ते घर सुद्धा समाधानाने नांदत असतं. आपलं एक वेगळं विश्व आहे, वेगळं घर आहे. आपली माणसं आहेत. आपली माणसं ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी एक वेगळं वातावरण तयार होत. आणि त्यावेळी लढ्याला बळ मिळत. आज आपल्याला शत्रूशी लढायचं आहे. आपल्या लोकांशी लढायचं नाही. आणि हि पहिलीच वेळ आहे कि आपण आपल्यांशी लढाई संपवून शत्रूशी लढाई लढतोय.
शिष्य : गुरुजी त्यांना आपण शत्रू म्हणायचं कि आपलंच म्हणायचं?
गुरुजी : वत्सा, तू चांगला प्रश्न विचारलास. ते जरी आपल्यातले असले तरी जिथं आपल्या गोष्टीला विरोध करतात, आपल्या सन्मानाला ठेच पोहोचवतात ते आपले असू शकत नाहीत. कारण प्रत्येकाचा सन्मान राखणे हे माणुसकीचे लक्षण आहे. आणि ज्यातील माणुसकी संपते त्याला जनतेत स्थान नसत.
शिष्य : गुरुजी दक्षिणेचा ठेकेदार आहे त्याच तर खूप नाव बदनाम झालं आहे.
गुरुजी : त्या केदारवाडीच्या माळावर जी जनावर हिंडत होती त्यांचा घास हिरावला, लहान मुलं खेळत होती, म्हातारी माणसं फिरायला जात होती तो केदारवाडीचा डोंगर घशात घालून त्याला समाधान झालं नाही. गावकुशीच्या बाहेर असलेली जमीन हि आपल्या सर्वांच्या सुखासाठी, समाधानासाठी, जनावरांना चरण्यासाठी ठेवलेली असते. अरे अशा पद्धतीची कामं…! माणसाला जमीन किती लागते? जेव्हा माणूस आयुष्याच्या उत्तरार्धात प्रवास करतो, त्यावेळी ६ X ३ ची जमीन खड्डा काढण्यासाठी पुरेशी असते. अग्नीही एव्हढ्याच जागेत दिला जातो! मग आपल्याला करायचंय काय? दुसऱ्याच्या दुःखात आपलं सुख म्हणणाऱ्याला जनता कशी आपल्या मनात स्थान देईल?
शिष्य : गुरुजी हे खरं आहे. म्हणूनच कांताला खूप पाठिंबा मिळतोय. जो आता सत्तेवर आरूढ आहे त्याचे पाठीराखे सुद्धा त्याला सोडून चाललेत. नगरपालिकेत जे सदस्य होते तेही म्हणतात कि आपल्याला अधिक गतीने काम करायचे असेल तर पुन्हा दक्षिणचा ठेकेदार निवडून न येणे चांगले! अशा पद्धतीचे चिंतेचे वातावरण विरोधकांच्या गोटात आहे.
गुरुजी : कौरव पांडवांच्या युद्धात कौरव शूर नव्हते कि त्यांच्याकडे संख्याबळ कमी होते?? त्यांच्याकडे धन नव्हते का? पण त्यांच्याकडे धर्म नव्हता. अधर्माचे कामं कधीच टिकत नाही.. ते वाया जात. लोक अधर्माला कधीच साथ देत नाहीत. त्यांची पावले नेहमीच धर्माच्या बाजूने असतात. अशापद्धतीने सर्व समाज धर्माच्याच बाजूने येतील आणि अधर्माचा नाश होईल, हे निश्चित आहे.
शिष्य : गुरुजी, तुम्ही बरेच दिवस संवाद साधला नाही. त्यामुळे माझ्या ज्ञानाला काही प्रश्न पडले होते. त्यांचे निरसन तुम्ही केले. आता मळभ दूर झाले आहेत. खूप आनंद झाला. या नवीन वातावरणात आल्हाददायक वाटत आहे. आपण असाच संवाद साधावा.. मी तुम्हाला प्रश्न विचारेन.. तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत.. असेच हे निरंतर सुरु राहावे… असं मला वाटतं…..