कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाच्या 2023 मधील सीईटी परीक्षेला आज शनिवारपासून राज्यातील 592 केंद्रांमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्तात प्रारंभ झाला आहे. राज्यातील एकूण 2 लाख 61 हजार परीक्षार्थींपैकी बेळगाव शहरांमध्ये 6722 विद्यार्थी -विद्यार्थिनी ही परीक्षा देत आहेत.
राज्यात आजपासून युजी सीईटी परीक्षेला प्रारंभ झाला असून 1.4 लाख विद्यार्थिनी, 1.21 लाख विद्यार्थी आणि 8 तृतीयपंथी असे एकूण 2 लाख 61 हजार परीक्षार्थी ही परीक्षा देत आहेत. बेळगाव शहरातील लिंगराज कॉलेज, गोगटे कॉलेज, सरदार कॉलेज, आरएलएस कॉलेज, ज्योती कॉलेज, बेननस्मिथ कॉलेज आणि गोगटे पियू कॉलेज या ठिकाणी या परीक्षेची केंद्रं आहेत.
सदर केंद्रांवर आज सकाळी परीक्षा देणारे विद्यार्थी -विद्यार्थिनी आणि पालक वर्गाची गर्दी पहायला मिळाली. बेळगाव शहरात एकूण 6722 विद्यार्थी सीईटी परीक्षा देत आहेत.
परीक्षा सुरळीत आणि पारदर्शी पार पडण्यासाठी परीक्षा मंडळाने अनेक नियम लागू केले असून त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. सर्व परीक्षा केंद्र परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्याबरोबरच केंद्र सभोवती 200 मीटर परिसरात 144 कलमान्वये जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे.