बेळगाव शहरातील महिला विद्यालय हायस्कूल या शाळेचा सलग दोन दिवस आयोजित शतक महोत्सवी सोहळा नुकताच अतिशय उत्साहात पार पडला.
महिला विद्यालय हायस्कूलच्या शतक महोत्सवी सोहळ्याची काल रविवारी यशस्वी सांगता झाली. संस्थेच्या अध्यक्षा डॉ. शोभा शानभाग यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सदर कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर व्याख्यात्या प्रा. माधुरी शानभाग यांच्यासह संस्थेचे खजिनदार गोविंद फडके आणि शाळेचे मुख्याध्यापक व्ही. एन. पाटील उपस्थित होते.
काल स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती असल्यामुळे कार्यक्रमाच्या प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात आजी-माजी विद्यार्थिनींच्या स्वागत गीत व शालेय गीताने झाली. तसेच सावरकरांना मानवंदना म्हणून त्यांनी अतिशय सुरेल आवाजात ‘जयोस्तुते’ हे स्फूर्ती गीत सादर केले. शाळेच्या माजी विद्यार्थिनी जीएसएस कॉलेजच्या प्राध्यापिका सुचिता कुलकर्णी यांनी व्याख्यात्या माधुरी शानभाग यांचा परिचय करून दिल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष व खजिनदार यांच्या हस्ते प्रा. माधुरी शानभाग यांचे स्मृतीचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
पहिल्या सत्रामध्ये प्रा. माधुरी शानभाग यांनी प्रोजेक्टरवर पीपीटीद्वारे ओघवत्या शैलीत व्याख्यान दिले. कानातील बहिणाबाई एक नवा दृष्टिकोन हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. त्यानंतर माजी मुख्याध्यापक व माजी विद्यार्थिनी यांचा लघु व्हिडिओ सादर करण्यात आला. तसेच शाळेत आजतागायत सेवा बजावलेल्या मुख्याध्यापकांचा तसेच ज्या ज्या शिक्षकांनी सेवा बजावली आहे त्या सर्वांचा आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
पहिल्या सत्राची सांगता संस्थेचे खजिनदार गोविंद फडके यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले त्यामध्ये आजी-माजी विद्यार्थिनींनी अतिशय सुंदर असे नृत्य, नाटक, गायन, वादन असे विविध पैलू सादर करून सांस्कृतिक कार्यक्रमांना बहार आणली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थिनी प्राजक्ता बेडेकर व नीला बांदेकर यांनी केले. याप्रसंगी निमंत्रित आणि हितचिंतकांसह शाळेच्या आजी-माजी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.