बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची सोमवार दि. ८ मे रोजी सायंकाळी ६ वाजता सांगता झाली असून यासंदर्भात आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नितेश पाटील यांनी महत्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत.
सोमवारी सायंकाळी ६ पासून कोणत्याही प्रकारच्या निवडणुकीसंदर्भातील जाहीर सभा व समारंभांना परवानगी दिली जाणार नाही. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मतदान संपण्याच्या ४८ तास आधी जाहीर प्रचारावर बंदी घालण्यात आली आहे.
मात्र उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करण्याची मुभा असेल. आज सायंकाळी ६ नंतर जाहीर प्रचार करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा डॉ. नितेश पाटील यांनी दिला आहे.
४८ तासांच्या कालावधीत प्रचारात्मक वाहने वापरण्यास परवानगी दिली जाणार नाही. जिल्ह्यातील कोणत्याही भागात जाहीर प्रचार करताना आढळून आल्यास तत्काळ गुन्हे नोंदविण्याच्या सूचना त्यांनी अठरा मतदारसंघातील निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
तसेच सर्व भरारी पथके आणि गुप्तचर पथकांनी दक्ष राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिले आहेत.