बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून राष्ट्रीय पक्षांनी मराठी भाषिकांसंदर्भातील आपली भूमिका जाहीर करावी, असे आव्हान महाराष्ट्र एकीकरण समितीचे उत्तर मतदार संघाचे उमेदवार ऍड. अमर येळ्ळूरकर यांनी दिले आहे. सीमाभागात मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी अस्मिता आणि मराठी भाषिक यांच्याबाबत राष्ट्रीय पक्ष नेहमीच दुटप्पी भूमिका घेतात. बेळगावमध्ये मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत शांत बसतात. उत्तर मतदार संघातील भाजप उमेदवार रवी पाटील आणि काँग्रेस उमेदवार असिफ सेठ यांनी सर्वप्रथम सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायासंदर्भात आणि मराठी भाषिकांसंदर्भात त्यांच्या भूमिका जाहीर कराव्यात असे आव्हान त्यांनी दिले आहे.
मनपावरील भगवा हटविण्यात आला, मराठी भाषिकांवर सातत्याने अन्याय होतात मात्र याबाबत राष्ट्रीय पक्षांच्या जाहीरनाम्यात कोणत्याच गोष्टींचा उल्लेख केलेला नाही. मराठी भाषिकांचा वापर केवळ निवडणुकीपुरता करणारे राष्ट्रीय पक्ष हे मराठी भाषिकांसाठी विषारी आहे. आज राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार मराठीतून प्रचार करत आहेत. मात्र मराठी भाषेसाठी, मराठी भाषिकांसाठी, मराठी भाषिकांच्या भाषिक अल्पसंख्यांक हक्कांसाठी, मराठी भाषेच्या जतनासाठी , मराठी भाषिकांची होत असलेली गळचेपी याबाबत आजवर त्यांनी कोणती भूमिका घेतली आणि यापुढे कोणती भूमिका घेणार हे येत्या दोन दिवसात स्पष्ट करावे, अशी मागणी अमर येळ्ळूरकर यांनी केली आहे. आपण एका विशिष्ट समाजाशी निगडित आहोत यासाठी एक भूमिका आणि दुसऱ्या बाजूला मराठी भाषिकांना दावणीला बांधण्याची दुसरी भूमिका अशा पद्धतीचा दुटप्पीपणा राष्ट्रीय पक्षांकडून केला जात आहे. यासाठी आपण राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांना जाहीर आव्हान देत असल्याचे त्यांनी सांगितले.
आज रवी पाटील यांची चव्हाट गल्ली येथे रॅली आहे. परंतु या रॅलीदरम्यान या गल्लीतील सरकारी शाळा क्रमांक ५ च्या मुद्द्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशीही मागणी अमर येळ्ळूरकर यांनी केली. चव्हाट गल्ली येथील शाळा क्रमांक ५ हि गोरगरिबांना न्याय देणारी शाळा होती, मराठी भाषिकांची शान होती, मात्र या शाळेचा व्यवहार भाजपचे खासदार आणि मंत्री जोल्ले यांच्या संस्थेने केला. याबाबत आपले मत आणि भूमिका काय असेल हे देखील जाहीरपणे सांगावे, असे आव्हान त्यांनी दिले.
सीमाभागात प्रचाराची रणभूमी पाहिली तर मराठी भाषिक जनता एकवटली आहे. मराठी भाषिकांसह इतर भाषिकांनी समितीच्या विजयाचा निर्धार केला आहे. याचीच धास्ती लागल्याने शनिवारी केंद्रीय गृहमंत्र्यांना या भागात रोड शो करावा लागला. देशाचे गृहमंत्री असणाऱ्या अमित शहांना प्रत्येक गोष्टींचा इत्यंभूत अहवाल जातो, इतकी मजबूत यंत्रणा त्यांच्याकडे असते. मात्र सीमाभागात मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत गृहमंत्र्यांनी एकही शब्द उच्चारला नाही. घटनेच्या अधिकारांची पायमल्ली होत असताना याचे संरक्षण करण्याची जबाबदारी गृहमंत्र्यांची असते मात्र आपल्या जबाबदारीत फारकत होत असल्याची सडेतोड टीका अमर येळ्ळूरकर यांनी केली.
यावेळी मराठी भाषिकांना आवाहन करताना ते म्हणाले, सीमावासीय कठीण काळातून जात आहेत. रात्र वैऱ्याची आहे. सध्या आपल्याला आपले भविष्य घडवायचे आहे. मराठी भाषा, संस्कृतीसाठी विकास साधत असताना एकसंघ राहून आपल्याला विकास साधायचा आहे. समितीने आजवर भाषेचा भेदभाव कधीच केला नाही. मात्र राष्ट्रीय पक्षांनी मराठी भाषा आणि मराठी भाषिकांसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन अमर येळ्ळूरकर यांनी केले आहे.