पेट्रोल पंपा शेजारी थांबलेल्या दोन कंटेनरना अचानक आग लागून त्या आगीत दोन्ही कंटेनरसह त्यामध्ये असलेल्या 16 कार गाड्या जळून बेचिराख झाल्याची घटना निपाणीनजीक पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाला लागून असणाऱ्या हिटणी फाटा येथे आज दुपारी 12:30 च्या सुमारास घडली. या दुर्घटनेमुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
याबाबतची अधिक माहिती अशी की, चेन्नई येथून अहमदाबादला नवीन कार गाड्या घेऊन जाणाऱ्या दोन कंटेनरचे चालक आज शुक्रवारी दुपारी जेवणासाठी हिटणी फाटा येथे पेट्रोल पंपानजीक असलेल्या धाब्यावर थांबले होते. त्यावेळी अचानक दोन्ही कंटेनरना आग लागली आणि त्या आगीने अल्पावधीत भीषण स्वरूप घेतले. याबाबतची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. कंटेनरना लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी निपाणी, संकेश्वर आणि हुक्केरी येथील अग्निशामक दलाचे पाण्याचे तीन बंब मागवावे लागले. तथापि अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणेपर्यंत दोन्ही कंटेनरसह त्यातील कार गाड्या जळून खाक झाल्यामुळे कोट्यावधींचे नुकसान झाले होते. कंटेनर्सना आग नेमकी कशामुळे लागली याचे निश्चित कारण उशिरापर्यंत समजू शकले नाही. पेट्रोल पंपानजीकच सदर आगीची दुर्घटना घडल्यामुळे अग्निशामक दलाच्या जवानांनी मात्र मोठ्या कौशल्याने खबरदारी घेत शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली हे विशेष होय. सदर घटनेची निपाणी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.