Monday, January 6, 2025

/

जाहीर प्रचारानंतर मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात उमेदवार व्यस्त

 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभेसाठी बुधवार दि. १० मे रोजी मतदान होणार असून सोमवारी सायंकाळी जाहीर प्रचाराची सांगता झाली आहे. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या सूचनांनुसार जाहीर सभा, जाहीर प्रचार करण्यास मनाई असल्याने उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे.

मतदानासाठी अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक राहिला असून प्रत्येकाच्या मनात हुरहूर वाढली आहे. गेल्या १५ दिवसांपासून उमेदवारांनी जाहीर प्रचाराच्या माध्यमातून मतयाचना केली. केंद्रीय मंत्री, अभिनेते, स्टार प्रचारक यांच्या माध्यमातून राष्ट्रीय पक्षांनी प्रचार, रोड शोचे आयोजन करत मतदारांना आवाहन केले आहे. गेल्या पंधरा दिवसात झालेल्या जाहीर प्रचारानंतर निवडणुकीची चुरस वाढली होती.मात्र हा प्रचार कितपत फायदेशीर ठरणार हे येत्या १३ तारखेला स्पष्ट होईल. आता मतदानासाठी काहीच तास शिल्लक राहिल्याने एकगठ्ठा मतदान पदरात पाडून घेण्यासाठी घरोघरी जाऊन वैयक्तिक रित्या मतदारांच्या गाठीभेटी घेण्याकडे उमेदवारांनी कल दिला आहे.

काही मतदार संघात अद्यापही छुप्या पद्धतीने भेटवस्तूंचे वाटप करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी राष्ट्रीय पक्षांकडून विरोधकांविरोधात अपप्रचार करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात येत असल्याचेही निदर्शनात आले आहे. विविध भागात वैयक्तिक गाठीभेटींना वेग आला असून संवेदनशील तसेच अतिसंवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.

सीमाभागात ग्रामीण मतदार संघातून प्रामुख्याने म. ए. समितीचे आर. एम. चौगुले, काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर, भाजपचे नागेश मन्नोळकर यांच्यात थेट लढत होणार आहे, तर उत्तर मतदार संघात भाजपचे डॉ. रवी पाटील, समितीचे ऍड. अमर येळ्ळूरकर, काँग्रेसचे असिफ सेठ आणि आपचे राजकुमार टोपाण्णावर यांच्यात लढत होणार आहे.

दक्षिणमध्ये म. ए. समितीचे रमाकांत कोंडुसकर आणि भाजपचे अभय पाटील यांच्यात थेट लढत होणार आहे तर खानापूरमध्ये म. ए. समितीचे मुरलीधर पाटील, काँग्रेसच्या अंजली निंबाळकर आणि भाजपचे विठ्ठल हलगेकर यांच्यात लढत होणार आहे. बुधवार दि. १० मे रोजी होणाऱ्या मतदानाचा निकाल १३ मे रोजी जाहीर होणार असून विजयाचा षटकार कोण मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.