परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आपला निकाल पाहून आई-वडील ओरडतील या भीतीने शालेय मुलांकडून आततायी निर्णय घेण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. नुकतेच एसएसएलसीसह शालांत परीक्षांचे निकाल जाहीर होताच गेल्या आठवड्यात शहरातील दोन मुले घरातून बेपत्ता झाली. सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे ही दोन्ही मुले सुखरूप परत सापडली असली तरी घरातून पळून जाण्याची किंवा एखादा टोकाचा निर्णय घेण्याची जी मानसिकता शालेय मुलांमध्ये निर्माण होत आहे त्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
या संदर्भात गेल्या आठवड्यातील बेपत्ता मुलांचा शोध लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे फेसबुक फ्रेंड्स सर्कल या सेवाभावी संघटनेचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांचे मत जाणून घेतले असता. ते म्हणाले की, शाळकरी मुले घरातून बेपत्ता होण्याचे किंवा अन्य एखादा आततायी निर्णय घेण्याचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. बेळगाव बेपत्ता होणाऱ्या आणि पुन्हा सापडणाऱ्या मुलांची मानसिकता समजून घेण्यासाठी सरकारने डॉक्टरांचे एक पथक नेमले पाहिजे. माझ्या मते प्रत्येक बेपत्ता मुलाला समुपदेशनाची गरज आहे. ही मुले सापडल्यानंतर त्यांना किमान 11 ते 21 दिवस बाल कल्याण गृहात ठेवले पाहिजे. ज्यामुळे त्यांना चांगला धडा मिळेल आणि ते आयुष्याबद्दल गांभीर्याने विचार करू लागतील.
एखादा मुलगा बेपत्ता झाला आणि स्वतःहून पुन्हा घरी परत आला किंवा एखाद्याने त्याला शोधून त्याच्या पालकाकडे सुपूर्द केले की पालकवर्ग आणखी डोक्याला व्याप नको म्हणून त्या मुलाला ओरडत नाहीत किंवा समजावायला जात नाहीत. परिणामी आपले आई -बाबा काय असेच वागणार असे गृहीत धरून भविष्यात ही मुले अधिक आक्रमक बनवून पुन्हा मागील आततायी वर्तनाची पुनरावृत्ती अधिक तीव्रतेने करतात. त्यामुळे मुलांच्या भल्यासाठी त्यांच्या पालकांना विश्वासात घेऊन एखाद कडक धोरण अंमलात आणले गेले पाहिजे असे मत व्यक्त करून शाळेतील हजार मुलांमधील एक मूल घरातून पळून जाऊन बेपत्ता होते अशावेळी त्या शाळेच्या नावलौकिकाचे काय होत असेल? याचा विचार करायला हवा. कारण घडलेल्या घटनेची त्या शाळेचा काही संबंध नसला तरी संपूर्ण जगाला त्या शाळेचे नाव समजते आणि संबंधित शाळेबद्दल एक प्रकारचा नकारात्मक संदेश सर्वत्र पसरतो. अशावेळी त्या शाळेतचा शिक्षक वर्ग आणि इतर विद्यार्थ्यांनाही लोकांच्या अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागते, असे दरेकर यांनी सांगितले.
स्व अनुभव सांगताना ते म्हणाले की मागील आठवड्यात घरातून बेपत्ता झालेली दोन्ही मुले शोधण्यासाठी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी आमची वाहने घेऊन शहर परिसरात सर्वत्र वणवण केली. यासाठी वाहनांच्या इंधनावर आम्हाला जवळपास दीड -दोन हजार रुपये खर्च करावे लागले. मात्र त्या खर्चाचा विचार न करता सामाजिक बांधिलकी जपत आम्ही आमचे काम केले. त्या मुलांना शोधून काढले. मात्र परतावा म्हणून आम्हाला काय मिळाले तर एका मुलाच्या पालकांना माणुसकी म्हणून आपल्या मुलाला शोधणाऱ्यांचे धन्यवाद मानावे असेही वाटले नाही. त्यांनी फोनवर आपल्या मुलाला तिथे कोणाबरोबर थांबू नकोस घरी येऊन टाक असे सांगून घरी बोलावून घेतले. त्यामुळे घरातून बेपत्ता होणारी मुले आणि त्यांच्या पालकांची मानसिकता बदलण्यासाठी पुढील गोष्टी आपण करू शकतो असे मला वाटते. बेपत्ता झालेला शाळकरी मुलगा अथवा मुलगी परत सुखरूप सापडल्यानंतर पोलिसांनी त्या मुलाला पालकांकडे सुपूर्द करण्यापूर्वी त्याला समुपदेशन आणि वैद्यकीय तपासणीसाठी प्रथम बिम्स हॉस्पिटलमध्ये धाडावे. त्या ठिकाणी मानसोपचार तज्ज्ञांनी तो मुलगा अथवा मुलगी मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त आहे याची खात्री दिल्यानंतरच त्यांना त्यांच्या पालकाकडे सुपूर्द केले जावे.
कारण पोलिसांना पाहून संबंधित मुल आणि त्याच्या पालकांमध्ये भीती निर्माण होणे साहजिक आहे. त्यासाठीच पोलीस, डॉक्टर आणि पालक यांच्या समन्वयातून एक समुपदेशन समिती निर्माण करणे गरजेचे आहे. ज्यामुळे पालक आपल्या पाल्याबद्दल मनमोकळेपणाने बोलू शकतील परिणामी त्या मुलाचे समुपदेशन करणे सुलभ होईल आणि भविष्यात संबंधित मुलांमध्ये सुधारणा होऊन ते आपले भवितव्य उज्वल करतील, असा विश्वासही संतोष दरेकर यांनी व्यक्त केला.