बेळगाव लाईव्ह : कर्नाटक सरकार सातत्याने मराठी भाषिकांवर दडपशाहीचे अस्त्र उगारण्यासाठी तत्पर असते. गर्लगुंजी येथे काँग्रेसच्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे मंत्री अशोक चव्हाण यांना काळी निशाणे दाखवत निषेध व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठी भाषिकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पुन्हा एकदा पोलिसी दंडेलशाही दाखवून दिली आहे.
लोकशाहीने दिलेल्या अधिकारानुसार आपल्या भावना व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. मात्र सीमाभागात राहणाऱ्या प्रत्येक मराठी भाषिकाला घटनेने दिलेल्या अधिकारापासून कर्नाटक सरकारने वंचित ठेवले आहे.
लोकशाही मार्गाने कोणताही लढा किंवा आंदोलन करणाऱ्या मराठी भाषिकांना दडपण्याचा प्रयत्न नेहमीच येथील प्रशासन करत असते. हि परिस्थिती महाराष्ट्रातील नेत्यांना ज्ञात असूनही निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रातील नेते महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधार्थ प्रचारासाठी हजर होतात, हि दुर्दैवी बाब आहे.
गुरुवारी बेळगावमध्ये देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, अशोक चव्हाण आदी नेत्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेदरम्यान संतप्त मराठी भाषिकांनी काळे निशाण दाखवले. टिळकचौक नंतर बेनकनहळ्ळी येथे झालेल्या प्रचारसभेदरम्यानही काळे निशाण दाखवून निषेध नोंदविण्यात आला. शुक्रवारी पुन्हा खानापूर मतदार संघात अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत आयोजिण्यात आलेल्या सभेदरम्यान तालुका म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी काळे निशाण दाखवत ‘अशोक चव्हाण गो बॅक’ चे नारे लगावले.
संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. मात्र पोलिसी बळाचा वापर करत आंदोलनकर्त्यांना दडपण्यात आले. आणि तातडीने त्यांना ताब्यात घेऊन वाहनातून नेण्यात आले. कर्नाटक प्रशासन आणि पोलिसांच्या या दडपशाहीचा आज सीमाभागात तीव्र शब्दात निषेध व्यक्त होत असून महाराष्ट्रातील नेत्यांनी हि बाब उघड डोळ्यांनी पाहून सीमाभागात यावे कि नाही? याचा विचार करावा, अशी भावना सीमावासीयातून व्यक्त होत आहे.