भारतीय नागरी सेवांसाठी आतापर्यंतच्या सर्वाधिक महिलांची निवड करण्याद्वारे केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नवा इतिहास निर्माण केला.
दुसरी अभिमानास्पद बाब म्हणजे यंदा बेळगाव जिल्ह्यातील अरभावी मठ येथील श्रुती येरगट्टी (एआयआर 362), उगारचा आदिनाथ तमदट्टी (एआयआर 566) आणि शेमनेवाडीचा अक्षय पाटील (एआयआर 746) तिघाजणांनी यूपीएससी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविले आहे.
केंद्रीय अर्थात भारतीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी नियुक्तीसाठी शिफारस झालेल्या 933 उमेदवारांपैकी एक तृतीयांश महिला आहेत हे विशेष होय. महिला उमेदवारांच्या नियुक्तीमध्ये यावेळी झालेली ही लक्षणीय वाढ आहे.
कारण अवघ्या दोन दशकांपूर्वी निवड झालेल्या उमेदवारांपैकी फक्त 20 टक्के महिलांना नागरी सेवेसाठी गृहीत धरले जात होते. आणखी एक विशेष बाब म्हणजे यंदाच्या यूपीएससी परीक्षेत देशातील आघाडीच्या पहिल्या चार क्रमांकावर महिला आहेत.
हे सलग दुसरे वर्ष आहे की महिला उमेदवारांनी पहिल्या तीन क्रमांकांमध्ये आपले स्थान कायम राखले आहे. दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजची विद्यार्थिनी इशिता किशोर हिने या प्रतिष्ठेच्या परीक्षेत यावेळी देशात अव्वल स्थान पटकावले आहे. इशिता ही श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स ची अर्थशास्त्रातील पदवीधर आहे. कश्मिरा संख्ये ही महाराष्ट्रातून पहिली आली आहे. कर्नाटकामध्ये दावणगिरी येथील अविनाश हा देशात 31 वा क्रमांक मिळवण्यासह राज्यात प्रथम आला आहे. कर्नाटकातील गोकाक तालुक्यातील अरभावी मठ गावातील श्रुती येरगट्टी हिने 362 वा क्रमांक, शमणेवाडी (ता. निपाणी) येथील अक्षय पाटील यांने 746 वा क्रमांक तर कागवाड तालुक्यातील उगार येथील आदिनाथ तमदट्टी याने देशात 566 वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.