बेळगाव शहरानजीकच्या शांताई वृद्धाश्रमामार्गे नावगे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची अलीकडे फार दुरावस्था झाली होती. यासंदर्भात शांताईचे कार्याध्यक्ष माजी महापौर विजय मोरे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सध्या या रस्त्याचा विकास साधण्यात येत असल्यामुळे वाहन चालक आणि गावकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
शांताई वृद्धाश्रमाकडे (नावगे) जाण्यासाठी असलेला रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून अवजड वाहने जाऊन खराब झाला होता. खाचखळगे पडलेल्या या रस्त्यावरून ये -जा करताना वाहन चालक आणि गावकऱ्यांची मोठी गैरसोय होत होती आता डांबरीकरण होत आहे हे काम प्रयतनात सदर बाब शांताई वृद्धाश्रमाचे कार्याध्यक्ष माजी महापौर विजय मोरे यांनी बेळगाव ग्रामीण आमदारांच्या निदर्शनास आणून देण्याबरोबरच सदर रस्त्याच्या विकासासाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता.
अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून महिन्याभरापासून सदर रस्त्याच्या विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे शांताई वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांचे नातलग, परिसरातील उद्योजक आणि गावकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
यासंदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना माजी महापौर विजय मोरे म्हणाले की, शांताई वृद्धाश्रमाकडे जाणारा नावगे, बामणवाडी गावचा रस्ता अतिशय खराब झाला होता. त्यामुळे शांताई वृद्धाश्रमाच्या संचालकांसह परिसरातील कारखानदार आणि बामणवाडी गावकऱ्यांनी बेळगाव ग्रामीणच्या आमदारांना सदर रस्त्याचा विकास साधण्याची विनंती केली होती.
त्या विनंतीला मान देऊन गेल्या महिनाभरापासून त्यांनी शांताई वृद्धाश्रमाकडे येणाऱ्या रस्त्याच्या विकास कामाला सुरूवात केली आहे. आजपासून रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू होईल. या पद्धतीने आमच्या विनंतीला मान देऊन आमदारांनी रस्त्याचा विकास साधल्याबद्दल बामणवाडी ग्रामस्थ, परिसरातील कारखानदार, शांताईचे सर्व संचालक आणि आश्रमातील ज्येष्ठ नागरिक यांच्यावतीने तसेच वैयक्तिक माजी महापौर म्हणून मी आमदारांचे आभार मानतो असे सांगून त्याचबरोबर आश्रमापर्यंतच्या रस्त्याचा ज्या पद्धतीने विकास साधण्यात आला आहे तसा त्यापुढील रस्त्याचा देखील साधला जावा अशी माझी बामणवाडी ग्रामस्थांच्यावतीने आमदारांना विनंती आहे, असे माजी महापौर विजय मोरे शेवटी म्हणाले.