विधानसभा निवडणुकीची मतमोजणी येत्या 13 मे रोजी होणार असून ती सुरळीत आणि शांततेत पार पडावी यासाठी जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी प्रतिबंधात्मक आदेश बजावला आहे.
सदर आदेश 12 मे रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून 14 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत लागू असणार आहे. या आदेशानुसार जिल्ह्यात कोठेही पाचहून अधिक जणांनी एकत्र येणे, मिरवणूक काढणे तसेच सभा-समारंभाचे आयोजन करण्यास निर्बंध असेल. तलवार सूरी, चाकू, बंदूक, कुऱ्हाड, कोयता, लाठी, टोणा यासारखी शरीराला अपायकारक ठरणारी शस्त्र, दगड किंवा तत्सम फेकण्यासारख्या वस्तू स्वतःजवळ ठेवून घेणे किंवा घेऊन फिरण्याला निर्बंध आहे.
निषेधासाठी माणसाची प्रतिकृती किंवा प्रतिमा तयार करून जाळणे, प्रक्षोभक उपहासात्मक भाषण करणे, गाणी म्हणणे, घोषणा देणे, अवमानकारक वक्तव्य करणे यावर देखील निर्बंध असेल. सदर आदेशाचे उल्लंघन करण्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा जिल्हा दंडाधिकारी नितेश पाटील यांनी आपल्या आदेशाद्वारे दिला आहे.
या खेरीज विधानसभेसाठी बुधवार दि 10 रोजी मतदान आणि शनिवार दि 13 रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. सदर प्रक्रिया सुरळीत व शांततेत होण्यासाठी अन्य एका आदेशाद्वारे येत्या 10 मे रोजी जिल्ह्यात होणारे साप्ताहिक बाजार आणि यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत.