सृजनतेचे दुसरे नांव म्हणजे शेतकरी… शेतकरी कधी थांबत नसतो. अन्नदात्या मातीशी असलेली त्याची नाळ कधीच तुटत नाही. शेतकरी असलेले महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि विधानसभा निवडणुकीतील उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्याकडे पाहिल्यानंतर त्याची प्रचिती येते. काल निवडणुकीचे मतदान झाले आणि शेतकऱ्यांसह कष्टकऱ्यांचे दुःख जाणारे रमाकांत दादा आज चक्क पुन्हा आपल्या शेतीच्या कामात व्यस्त झाले आहेत.
मशागत, पेरणी, कोळपणी, काढणी वगैरे कामे हा शेतकऱ्याचा नित्यक्रम असतो शेतकरी त्यापासून वेगळा होऊ शकत नाही. बळीराजा हा अन्नदाता आहे. यांना अन्नदात्याला तिन्ही त्रिकाळ सजग राहावे लागते. आपल्या कामात व्यस्त रहावे लागते. यामध्ये त्याचे सोबती असतात त्याचे बैल. शेतकऱ्याचे मातीशी कायम दृढ नातं असतं. आपल्या कामाशी तादात्म्य पावणारा शेतकरी हा सृजनशील शेतकऱ्याचे प्रतीक असतो. स्वतः शेतकरी असलेले रमाकांत कोंडुसकर हे त्यापैकीच एक आहेत.
माणसाच्या मनांची मशागत करणाऱ्या रमाकांत कोंडुसकर यांच्यात एक प्रामाणिक सच्चा शेतकरी पहावयास मिळतो. कारण आता निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर ते पुन्हा आपल्या मातीशी निगडित झाले आहेत. काल बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. रमाकांत कोंडुसकर हे या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार म्हणून बेळगाव दक्षिण मतदार संघातून रिंगणात आहेत.
बेळगावकरांचे हित साधण्यासाठी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेणारे कोंडुसकर गेल्या महिन्याभरापासून अनवाणी पायाने प्रचारात व्यस्त होते. मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी संपूर्ण दक्षिण विधानसभा मतदारसंघ त्यांनी अनवाणी पायांनी पिजून काढला.
अनवाणी पायांनी प्रचार करण्याचे कारण की, सुरुवातीला जेंव्हा रमाकांत दादा प्रचारासाठी रस्त्यावर उतरले त्यावेळी ठिकठिकाणी माता भगिनींनी पायावर पाणी घालून त्यांचे औक्षण केले. तेंव्हा प्रत्येक वेळी पायातील चप्पल काढावे लागत होते. छ. शिवाजी महाराजांना आपले दैवत मानणाऱ्या रमाकांत दादांना चप्पल घातलेले आपले पाय माता भगिनींकडून धुवून घेणे म्हणजे त्यांचा एक प्रकारे अपमान केल्यासारखा आहे असे वाटून प्रचारादरम्यान पायात चप्पल न घालताच अनवाणी फिरण्याचा निर्धार त्यांनी केला आणि तो तडीसही नेला. कष्टकरी शेतकरी असलेले हेच रमाकांत कोंडुसकर आता निवडणुकीची धामधूम समाप्त होताच पुन्हा आपल्या शेतीच्या कामात व्यस्त झाले आहेत.
काल बुधवारी सायंकाळी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे मतदान समाप्त झाले आणि आज सकाळी कोंडुसकर यांनी आपल्या शेतात जोत जुंपून नेहमीप्रमाणे शेतीच्या कामाला सुरुवात केली. शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे दुःख जाणणाऱ्या रमाकांत कोंडुसकर यांचा समाज कार्य करण्याबरोबरच शेतीचे संरक्षण व संवर्धन करण्याचा हा आदर्श एक इतरांनी घेण्यासारखा आहे.