बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून अवघ्या दोन दिवसांवर मतदान प्रक्रिया होणार आहे. राज्यात सर्वाधिक चुरशीने यंदा बेळगावच्या चार मतदार संघात निवडणूक होणार असून बेळगाव उत्तर, ग्रामीण, दक्षिण आणि खानापूर तालुका या चार मतदार संघांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे.
दरम्यान प्रचारदेखील अंतिम टप्प्यात आला असून समितीला मिळत असलेला पाठिंबा पाहून राष्ट्रीय पक्षांच्या पायाखालची जमीन घसरली असल्याचे लक्षात येत आहे. समितीच्या उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याच्या अफवा पसरविण्यात येत असून या पार्श्वभूमीवर आज उत्तर मतदार संघाचे समितीचे उमेदवार ऍड. अमर येळ्ळूरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रीय पक्षांना पुन्हा एकदा जाहीर आव्हान दिले आहे.
देशात नंबर १ वर आपला पक्ष आहे असे ठामपणे सांगणाऱ्या आणि सत्तारूढ असणाऱ्या भाजपकडून समितीचा अपप्रचार सुरु असून उत्तर मतदार संघात भाजपचे उमेदवार डॉ. रवी पाटील यांचा पराभाव अटळ असल्याचे ऍड. अमर येळ्ळूरकर म्हणाले.
महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावमध्ये बोलावून प्रचार करण्यात आला. प्रचार मराठी भाषेतून करण्यात आला. मात्र जाहीरनाम्यात मराठी भाषा आणि मराठी भाषिकांसाठी कोणतीही गोष्ट स्पष्ट करण्यात आली नाही. महाराष्ट्रातील नेते मंडळी सीमाभागात येऊन राजकारण करू पाहत आहेत. या मंडळींनी सत्तेचे राजकारण महाराष्ट्रात करावे, आपल्या वैयक्तिक राजकारणासाठी सीमावासीयांना दावणीला बंधू नका असा इशाराही अमर येळ्ळूरकर यांनी दिला.
समितीच्या ध्येयधोरणांमुळे या निवडणुकीत केवळ मराठी भाषिक नव्हे तर इतर सर्व भाषिकांनी समितीला पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळेच भाजपकडून समिती उमेदवारांचे आणि विशेषतः मराठी भाषिकांचे खच्चीकरण करण्यासाठी अशा खालच्या स्तरावरील गोष्टी करण्यात येत आहेत.
या गोष्टी एका राष्ट्रीय पक्षासाठी अशोभनीय असून हा भाजपचा फ्लॉप रोड शो आणि प्रचाराचा परिणाम असल्याची सडेतोड टीकाही अमर येळ्ळूरकर यांनी पत्रकार परिषदेत केली. या पत्रकार परिषदेला समिती नेते, मान्यवर, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.