.विधानसभा निवडणुकीतील मतांसाठी बेळगावमध्ये आपल्या जाहीरनाम्यात विकासाचा मुद्दा पुढे करणाऱ्या भाजप व काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांनी आणि त्यांच्या उमेदवारांनी सर्वप्रथम येथील मराठी भाषा संस्कृतीच्या संरक्षणासाठीची आपली भूमिका स्पष्ट करावी, असे जाहीर आव्हान बेळगाव उत्तर मधील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार ॲड. अमर येळळूरकर यांनी दिले आहे.
शहरात प्रसार माध्यमांची बोलताना समितीचे उमेदवार ॲड. अमर येळळूरकर म्हणाले की, महाराष्ट्राची करण समितीचा प्रचार जोमाने सुरू आहे आणि जनतेने ही समितीला विजयी करण्याचा निर्धार केला आहे. दुसरीकडे भाजप आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात बेळगावच्या विकासाचा मुद्दा घेतला आहे. मात्र त्या पलीकडे जाऊन मराठी भाषिकांवरील अन्याय-अत्याचार, त्यांचे खच्चीकरण हा जो मुद्दा आहे तो त्यांच्या कोणत्याही जाहीरनाम्यात दिसत नाही.
मला भाजपचे उमेदवार डॉ. रवी पाटील आणि काँग्रेसचे राजू सेठ यांना विचारायचे आहे की, मराठी भाषेची बेळगावात जी गळचेपी चालली आहे, जे खच्चीकरण सुरू आहे त्याबद्दल तुमची भूमिका काय आहे? मराठी भाषिकांवरील अन्याय अत्याचार आणि वेळोवेळी होणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान, त्याबद्दल भूमिका न मांडता जर तुम्ही फक्त विकासाचे मुद्दे मांडत असाल तर बेळगावचा विकास साधण्यासाठी येथील जनता आणि महानगरपालिका सक्षम आहे.
बेळगाव येथील जनतेचा मूलभूत प्रश्न जो आहे तो मराठी भाषा, संस्कृती आणि शिवरायांबद्दलचा स्वाभिमान टिकवण्यासाठीचा आहे. तुम्ही त्याबाबतीत मतदारांना काय आश्वासन देणार? हे जाणून घेण्यासाठी जनता उत्सुक आहे असे सांगून तेंव्हा नजीकच्या काळात मतदानापूर्वी या संदर्भातील डॉ. पाटील व सेठ यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे ॲड. येळ्ळूरकर म्हणाले.
विकासाचा मुद्दा पुढे करून मराठी किंवा इतर भाषिकांची मते मिळवण्याचा प्रयत्न करत असताना येथील पुर्वापार मराठी संस्कृती टिकवण्यासाठी तुमची काय भूमिका आहे? त्याबाबतीत तुमच्या पक्षाचा कोणता जाहीरनामा आहे? ते स्पष्ट करावे. विधानसभेमध्ये गेल्या 23 फेब्रुवारी 2023 रोजी कन्नड विकास प्राधिकरणाबद्दलचा जो कायदा मंजूर झाला त्याबद्दल तुमची भूमिका काय? हे देखील स्पष्ट करावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा पक्ष मराठी भाषेच्या संरक्षणासाठी काय करणार? त्याबाबतीत तुमच्या पक्षाची भूमिका काय? ते जाहीर करावे, असे आव्हान उमेदवार ॲड. अमर येळ्ळूरकर यांनी दिले.