वर्षभरापूर्वी बेळगाव -राकसकोप रस्त्यावर मोटर वाहन अपघातात मृत्युमुखी पडलेल्या राकसकोप (ता. जि. बेळगाव) येथील भाऊराव नारायण कंग्राळकर यांच्या वारसदारांना भरपाई दाखल व्याजासहित एकूण 61 लाख 50 हजार रुपये देण्याचा आदेश बेळगाव चतुर्थ जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मोहन प्रभू यांनी बजावला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, गेल्या 7 डिसेंबर 2021 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास राकसकोपचे रहिवासी भाऊराव कंग्राळकर हे आपल्या दुचाकीवरून बेळगुंदी येथून आपल्या गावी निघाले होते. तेंव्हा बेळगाव -राकसकोप रोडवर सोनोली जवळील केंबाळी नाल्यावरील रस्त्यावर नियंत्रण सुटलेल्या एका दुचाकी स्वाराने भरधाव वेगात त्यांना धडक दिली. सदर अपघातात भाऊराव कंग्राळकर गंभीररित्या जखमी झाले.
त्यावेळी अपघातानंतर जमलेल्या लोकांनी त्यांना उपचारासाठी तातडीने केएलई हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र उपचाराचा फायदा न होता भाऊराव यांचे दुर्दैवाने निधन झाले. सदर अपघाताची नोंद बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी अंती अपघाताला जबाबदार व्यक्तीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते.
सदर अपघाताबद्दल मयताच्या वारसदारांनी मृत्यूची नुकसान भरपाई मिळावी म्हणून गाडी मालक व विमा कंपनी विरुद्ध जिल्हा न्यायालयामध्ये भरपाई दावा दाखल केला होता. सदर दाव्यामधील साक्षी-पुरावा व कागदोपत्रांची पडताळणी करून बेळगाव चतुर्थ जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मोहन प्रभू यांनी आपला निर्णय देताना ओरिएंटल विमा कंपनीने मयताच्या वारसदारांना भरपाई दाखल व्याजासहित एकूण 61 लाख 50 हजार रुपये देण्याचा आदेश बजावला आहे.
मयताच्या वारसदाराच्यावतीने भरपाई दाव्याचे कामकाज बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पाहिले.