विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव दक्षिण मतदार संघातून धडाडीचे युवा कार्यकर्ते रमाकांत दादा कोंडुसकर यांचीच महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवड केली जावी, अशी विनंती बेळगाव जिल्हा युवा सेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सीमाभाग यांनी आज एका पत्राद्वारे शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या निवड समितीकडे केली आहे.
बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्व समाजाला एकत्र करण्याच्या दृष्टीने बेळगाव जिल्हा युवा सेना सतत प्रयत्नशील असते.
त्या अनुषंगाने सगळ्यांची उमेद वाढविणारे, समिती सोबत असलेले, सीमाप्रश्नासाठी रस्त्यावर उतरणारे युवा वर्गाचे छावा रमाकांत दादा कोंडुसकर या तगड्या उमेदवाराला म. ए. समितीने आपली अधिकृत उमेदवारी द्यावी अशी विनंती आहे.
त्यांना जर उमेदवारी देत असाल तर शिवसेनेचा पाठिंबा असेल आणि शिवसेनेचे नेते सुद्धा प्रचाराला येतील. ही वेळ वाया जाऊ देऊ नका. मराठी माणसांची एकी ही अशीच राहू देत.
बेळगाव दक्षिण विभाग मतदार संघात रमाकांत दादा कोंडुसकर यांनाच महाराष्ट्र एकीकरण समितीने उमेदवारी द्यावी अशी कळकळीची विनंती, अशा आशयाचा तपशील युवा सेना सीमाभाग बेळगाव या संघटनेच्या विनंती पत्रात नमूद आहे. त्यांनी आपले हे पत्र आज शुक्रवारी शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या निवड समितीकडे सुपूर्द केले आहे.