बेळगाव लाईव्ह : भाजप हायकमांडने बेळगाव जिल्ह्यातील १८ मतदार संघांच्या उमेदवारांची नावे घोषित केली असून बेळगाव उत्तर मतदार संघातून विद्यमान आमदार अनिल बेनके यांना उमेदवारी नाकारली आहे. बेळगावमधील विद्यमान आमदारांपैकी बेळगाव उत्तर मधून अनिल बेनके आणि रामदूर्ग मधून महादेवाप्पा यादवाड या दोघा आमदारांची उमेदवारी नाकारण्यात आली . बेळगावात बेनके समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हायकमांडने उमेदवारी नाकारल्यानंतर अनिल बेनके काँग्रेसकडे उमेदवारी मागणार कि पुन्हा महाराष्ट्र एकीकरण समितीकडे घरवापसी करणार? कि अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार किंवा भाजपमध्येच राहणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. उत्तर मतदार संघातील लिंगायत मतदारांची संख्या लक्षात घेत भाजपने या मतदार संघात मराठा समाजाच्या नेत्याला डावलले आहे.
गेल्या ५ वर्षात आमदार अनिल बेनके यांनी उत्तर मतदार संघात जातीय सलोखा राखला असून एकही दंगल या भागात होऊ दिली नाही. मात्र बेनके यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने बेनके समर्थक कमालीचे नाराज झाले आहेत. भाजपाची उमेदवार यादी जाहीर झालेल्या काही क्षणातच सोशल मीडियावर बेनके यांच्या समर्थनार्थ कमेंट्स पोस्ट होऊ लागल्या असून भाजपने जाणीवपूर्वक मराठा समाजाला उमेदवारी नाकारल्याचे बोलले जात आहे.
उमेदवारी नाकारल्यानंतर अनिल बेनके कोणते पाऊल उचलणार? याकडे सर्वांचे लक्ष वेधले असतानाच अनिल बेनके यांनी समितीकडे परतीची वाट धरल्यास उत्तर मधील मराठी मते आणि अनिल बेनके यांची वैयक्तिक मते असे एकगठ्ठा मतदार त्यांच्या समर्थनार्थ येऊ शकतील. काँग्रेसनेही उत्तर मतदार संघासाठी अद्याप उमेदवारी जाहीर केली नसून जरी राजू सेठ यांना झुकते माप असले तरी काँग्रेसकडून उमेदवारी मिळविण्यासाठी अनिल बेनके प्रयत्न करतील का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.