बेळगाव लाईव्ह : बेळगाव आणि कलबुर्गीसह उत्तर कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांमध्ये मे महिन्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होणार असून, राज्य सरकारने महाराष्ट्र सरकारला कृष्णा नदीत प्रत्येकी तीन टीएमसी पाणी सोडण्याची विनंती केली आहे. यामुळे भीमा तीरावरील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठीही विनंती केली आहे.
कर्नाटकच्या जलसंपदा विभागाचे उपमुख्य सचिव राकेश आयिंग यांनी महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाच्या उपमुख्य सचिवांना १५ ऑगस्ट रोजी पत्र लिहिले आहे. उत्तर कर्नाटकात, बेळगाव, विजयपूर, बागलकोट, कलबुर्गी, रायचूर, यादगिरी या जिल्ह्यांमध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीला पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.
राज्यातील हिप्परगी बॅरेजमध्ये पाणीसाठा कमी झाला असून नागरिकांना आणि पशुधनांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये यासाठी महाराष्ट्र राज्यातील वारणा/कोयना जलाशयातून ३ टीएमसी अतिरिक्त पाणी कृष्णा नदीत सोडण्यात यावे,
तसेच महाराष्ट्रातील उजनी जलाशयातून भीमा नदीत ३ टीएमसी पाणी सोडण्यात यावे. त्यामुळे मानवतेच्या दृष्टिकोनातून नागरिकांना आणि जनावरांना पिण्याचे पाणी मिळेल, यासाठी मे आणि जून महिन्यात एकूण सहा टीएमसी पाणी सोडण्यात यावे, अशी विनंती राकेश सिंह यांनी पत्रात केली आहे.