बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार पद मिळावे यासाठी रिंगणात उतरलेल्या उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते वल्लभ गुणाजी यांनी दाखवलेल्या मोठ्या मनाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
मराठी भाषिकांचा आवाज बुलंद करण्यासाठी रमाकांत कोंडुसकर हेच दक्षिण मध्ये उमेदवार म्हणून योग्य आहेत. त्यांना पाठिंबा म्हणून वल्लभ गुणाजी यांनी माघार घेतली. याशिवाय अर्ज भरताना दिलेली अनामत रक्कमही संबंधित उमेदवाराच्या निवडणूक खर्चासाठी वापरली जावी असे सांगत त्यावर पाणी सोडले आहे.
माघारीच्या बरोबरीनेच अधिकृत उमेदवारांच्या खर्चाची ही तजबीज करणाऱ्या वल्लभ गुणाजी यांच्या मोठ्या मनाची जोरदार चर्चा सुरू आहे. वल्लभ गुणाजी एक प्रसिद्ध उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.
खानापूर तालुक्या पासून ते सोलापूर जिल्ह्यापर्यंत त्यांच्या उद्योजकतेचा विस्तार पसरलेला आहे. मानव हक्क आयोगाचे अध्यक्ष ते इतर अनेक महत्त्वाच्या पदांच्या जबाबदाऱ्या त्यांनी निभावल्या असून यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.
एकूणच इच्छुकांची अधिक संख्या आणि निवडणूक लढवण्यासाठी रमाकांत कोंडुस्कर हे नाव योग्य वाटल्याने वल्लभ गुणाजी यांनी आपली माघार जाहीर केलेली असून रमाकांत कोंडुसकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
एकीकडे इच्छुकांची भाऊगर्दी सुरू असताना एका उमेदवाराने घालून दिलेला हा आदर्श सर्वत्र चर्चेला जात आहे.