बेळगाव लाईव्ह : गेल्या दोन निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला सातत्याने पराभव पत्करावा लागला असून मराठी भाषिक जनतेकडून समिती नेत्यांना निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर समितीमध्ये एकी झाली असून निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्यासाठी जम्बो कमिटीची नेमणूक करण्यात आली आहे.
बुधवारी मराठा मंदिर येथे तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून ग्रामीण मतदार संघासाठी इच्छुक म्हणून अर्ज केलेल्या आर. एम. चौगुले, आर. आय. पाटील, शिवाजी सुंठकर, सुधीर चव्हाण आणि रामचंद्र मोदगेकर यांच्यासाठी मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. १३१ पैकी ज्या उमेदवाराला ६६ मते पडतील तोच उमेदवार अधिकृत म्हणून जाहीर करण्यात येणार आहे. पहिल्या फेरीत ६५ हुन कमी मतदान इच्छुक उमेदवाराला पडल्यास दुसऱ्या फेरीचा अवलंब करण्यात येणार आहे.
ग्रामीण मतदार संघात गेल्या वर्षभरात समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांनी विविध कार्यक्रमांचा धडाका राबविला आहे. तर भाजपमधून घरवापसी केलेल्या माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनीही अनेक कार्यक्रमातून सक्रिय सहभाग दर्शविला आहे. याचप्रमाणे समिती नेते आर. आय. पाटील यांनी देखील गेल्या वर्ष-दीड वर्षात अनेक उपक्रम राबवून जनतेचा पाठिंबा मिळविला आहे. एकूण पाच इच्छुकांपैकी खरी लढत हि आर. एम. चौगुले, शिवाजी सुंठकर आणि आर. आय. पाटील यांच्यातच पाहायला मिळणार असून १३१ जणांच्या जम्बो कमिटीच्या बैठकीनंतर उमेदवार निश्चित होणार आहे.
ग्रामीण मतदार संघात काँग्रेसकडून विद्यमान आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती आणि भाजप अशी तिरंगी लढत पहायला मिळणार असून ग्रामीण मध्ये होणाऱ्या चुरशीच्या निवडणुकीसाठी समितीकडून कोणता उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविला जाणार हे उद्याच्या बैठकीनंतर स्पष्ट होणार आहे.
यामुळे तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दृष्टिकोनातून बुधवार हा महत्वाचा दिवस ठरणार आहे. उद्याच्या बैठकीत घेतल्या जाणाऱ्या निर्णयामुळे अनेक रुसवे फुगवे देखील होण्याची शक्यता असून ग्रामीण मतदार संघाची उमेदवारी कुणाला मिळणार आणि समितीचे राजकारण कोणते बाण घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.