बेळगाव लाईव्ह : बेळगाव ग्रामीण मतदारसंघाचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांचा उमेदवारी अर्ज उद्या सकाळी ११.०० वाजता हजारो समर्थकांच्या उपस्थितीत दाखल करण्यात येणार आहे.
धर्मवीर संभाजी चौकातून भव्य मिरवणुकीने कॉलेज रोडमार्गे चन्नमा सर्कल, काकतीवेसहुन रिसालदार गल्लीतील तहसीलदार कार्यालयात अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
यावेळी तालुक्यातील सर्व आजी माजी जिल्हापंचायत, तालुका पंचायत, ग्रामपंचायत सदस्य तसेच महिला मंडळे, युवक मंडळे, भजनी मंडळे व कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे तसेच येताना भगवे ध्वज,भगवे फेटे, टोप्या व शाली घालून यावे, असे आवाहन कार्याध्यक्ष मनोहर किणेकर आणि सरचिटणीस एम. जी. पाटील यांनी केले आहे.
ग्रामीण मतदार संघात लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मंगळवारी शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला सोमवारी भाजप कडून अर्ज दाखल झाला होता उद्या एकीकरण समितीचा अर्ज दाखल केला जाणार आहे.
सीमाभागातील मराठी अस्मिता जागृत करण्यासाठी आणि विधानसभेत मराठी भाषिकांचा आवाज उठवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे, त्यासाठी मराठी जनतेने तालुका समितीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता समिती उमेदवाराच्या पाठीशी थांबावे असे आवाहन जिल्हा पंचायत माजी सदस्या सरस्वती पाटील यांनी केले.
तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक मंगळवारी (दि. 18) सदाशिव नगर येथील प्रचार कार्यालयात झाली. अध्यक्षस्थानी ॲड. राजाभाऊ पाटील होते. या बैठकीत आगामी रणनीतीबाबत चर्चा झाली.
यावेळी सरस्वती पाटील यांनी, मराठी माणसाने कोणत्याही परिस्थितीत आमिषांना बळी पडू नये. आम्हाला लढा यशस्वी करावा लागणार आहे. समितीच्या कार्यकर्त्यासाठी आपल्याकडे वेळ कमी आहे या वेळेत नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने करून सर्व ग्रामीण भागा पिंजून काढले जावे यासाठी नवी रणनीती आखावी, असे आवाहन केले.
यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले, मराठी भाषा संस्कृतीच्या अस्मितेसाठी सर्वांनी एकत्र येणे अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येकाने आपण स्वतः उमेदवार समजून काम करावे. तसेच बेळगाव ग्रामीण मतदार संघातील समितीचे उमेदवार आर. एम. चौगुले यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
यावेळी रामचंद्र मोदगेकर, डी. बी. पाटील,माणिक होनगेकर, रामचंद्र कुद्रेमनीकर, डॉ. नितीन राजगोळकर, प्रशांत पाटील, माजी एपीएमसी सदस्य आर. के. पाटील, बी. डी. मोहनगेकर, सरचिटणीस एम. जी. पाटील, गणपत पाटील, सागर खांडेकर, अनिल पाटील , अरविंद पाटील, प्रेमा जाधव, मनोज पावशे, लक्ष्मण होनगेकर, आर. आय. पाटील, ॲड. सुधिर चव्हाण, कमल मनोलकर, आर. एम. चौगुले आदींनी मनोगत व्यक्त केले. ॲड. राजाभाऊ पाटील यांनी अध्यक्षीय भाषण केले. मनोहर संताजी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
महाराष्ट्रातील नेत्यांचा निषेध
महाराष्ट्र राज्य मंत्री गिरीश महाजन आणि नेत्या चित्रा वाघ या बेळगाव दाखल झाल्यात त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला. काँग्रेस आणि भाजपच्या नेते मंडळींनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात प्रचारासाठी त्यांचा जाहीर निषेध समितीच्या वतीने करण्यात आला आहे.