बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण समितीचे धडाडीचे नेते रमाकांत कोंडुसकर हे विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव दक्षिण मतदार संघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असून गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता समितीकडे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विनंती अर्ज दाखल करणार आहेत.
बेळगाव दक्षिण मतदार संघात महाराष्ट्र एकीकरण समितीला विजयी होण्यासाठी तगड्या उमेदवाराची गरज आहे. रमाकांत कोंडूसकर निवडणूक रिंगणात येणार असल्यामुळे राष्ट्रीय पक्षातील उमेदवारांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
भगवा ध्वज, मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीची कावीळ झालेल्याना गाडण्यासाठी कोंडूसकर यांना पसंती दिली जात आहे. रमाकांत कोंडूसकर उद्या आपल्या समर्थकांसमवेत पदयात्रेने आपला अर्ज दाखल करणार आहेत.
आपल्या समर्थकांसमवेत रमाकांत कोंडुसकर गुरुवारी सायंकाळी आपला अर्ज महाराष्ट्र एकीकरण समितीकडे सादर करणार आहेत. तत्पूर्वी ध. संभाजी चौकातील श्री शंभू तीर्थ येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार घालून अभिवादन करणार आहेत.
त्यानंतर मराठा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या जत्ती मठामध्ये पूजाविधी करून रामलिंग खिंड गल्ली येथील रंगुबाई पॅलेस येथे जाऊन म. ए समितीच्या कार्यालयात आपला अर्ज दाखल करतील.
यावेळी म. ए. समितीचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. रमाकांत कोंडुसकर यांचे हितचिंतक आणि समिती कार्यकर्त्यांनी उद्या सायंकाळी ५.३० वाजता धर्मवीर संभाजी चौकात उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.