राज्यातील एसएसएलसी म्हणजे दहावीच्या पेपर तपासणीला येत्या सोमवार दि. 24 एप्रिलपासून प्रारंभ होणार असून बेळगाव शहरातील आठ केंद्रांवर सुमारे 500 हून अधिक शिक्षक सहा विषयांचे पेपर तपासणार आहेत.
दहावीची परीक्षा गेल्या 31 मार्च ते 15 एप्रिल या कालावधीत पार पडली. परीक्षेचा निकाल वेळेत लागावा यासाठी शिक्षण खात्याने परीक्षा संपलेल्या आठ दिवसातच पेपर तपासणीचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. सदर काम 15 दिवसात पूर्ण केले जाणार आहे. बेळगाव शहरातील सेंट मेरीज हायस्कूल, सेंटपॉल हायस्कूल, उषाताई गोगटे हायस्कूल, सेंट झेवियर हायस्कूल, सिद्धरामेश्वर हायस्कूल शिवबसवनगर, कन्नड मिडीयम स्कूल महांतेशनगर, सेंट अँथोनी हायस्कूल कॅम्प आणि महिला विद्यालय मराठी शाळा या ठिकाणी पेपर तपासणी होणार आहे.
सर्व पेपर तपासणी केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणारा असून तपासणीचे काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी मूल्यमापकांची संख्या वाढविण्यात येणार आहे. बेळगाव शहरासह राज्यातील विविध पेपर तपासणी केंद्र यांवर येत्या 24 एप्रिलपासून पेपर तपासणी सुरू होणार आहे.
पेपर तपासणी केंद्रंवर सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. येत्या मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.