राजहंसगड गावामध्ये सध्या मोठी पाणी टंचाई निर्माण झाली असून ग्रामपंचायतकडून दखल घेतली जात नसल्यामुळे गावच्या नागरिकांनी थेट तालुका पंचायत, जिल्हा पंचायत आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून गावातील पाणीटंचाई दूर करण्याची मागणी केली आहे.
ऐन उन्हाळ्यात राजहंसगडला पाणी समस्येच्या झळा पोहचू लागल्या आहेत. मुबलक प्रमाणात पाणी साठा असूनही पंचायतच्या ढिसाळ कारभारामुळे गावकऱ्यांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गावातील पाणीटंचाई संदर्भात तक्रार करायची झाल्यास पंचायत विकास अधिकारी (पीडीओ) फोन उचलत नाहीत आणि पंचायतमध्ये गेल्यावर भेटत नाहीत. यामुळे संतप्त गावकऱ्यांनी थेट तालुका पंचायत, जिल्हा पंचायत, आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पाणी समस्या दूर करण्यासाठी साकडे घातले आहे.
राजहंसगड गावात निर्माण झालेली पाणी टंचाई ही एक गंभीर बाब आहे. कारण या गावात विहीर अथवा बोरवेल किंवा नदी नाल्याचा कोणताही स्त्रोत नाही. सरकारने जवळपास 1 कोटी रूपये खर्च करून नंदिहळळीपासून पाईप लाईन करून राजहंसगडची पाणी समस्या निवारण करण्याचा प्रयत्न केला आहे.
मात्र पंचायतचे योग्य नियोजन नसल्यामुळे ग्रामस्थांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. सध्या सर्वत्र सरकारी अधिकाऱ्यांना निवडणूक कामाला जुंपण्यात आले आहे. या कारणातून पीडीओ जनतेचे फोन उचलण्यास टाळाटाळ करीत आहेत.
मात्र याचा फटका सर्व सामान्य जनतेला बसत आहे. तरी याबाबत जिल्हा प्रशासनाने तातडीने पाऊले उचलावीत व पाणी टंचाई दूर करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.