बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून निवडणूक लढविणारे दक्षिण मतदार संघाचे उमेदवार रमाकांत कोंडुसकर आणि उत्तर मतदार संघाचे ऍड. अमर येळ्ळूरकर यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे.
रमाकांत कोंडुसकर आणि अमर येळ्ळूरकर यांनी २० एप्रिल रोजी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. दरम्यान उमेदवारी अर्ज सादर करतेवेळी जोरदार शक्तिप्रदर्शनही करण्यात आले.
यावेळी जमलेल्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. सदर घोषणाबाजी हि राज्यविरोधी असल्याचे सांगत नोडल अधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करताना झालेले शक्तिप्रदर्शन आणि यावेळी तमाम मराठी भाषिकांनी दिलेल्या सीमाप्रश्नासंदर्भातील घोषणा यामुळे हि तक्रार दाखल करण्यात आली असून आचारसंहितेचे उल्लंघन करण्यात आल्याचेही या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
मराठी दैनिके, प्रसारमाध्यम तसेच सोशल मीडियावर या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. यासंदर्भात कन्नड प्रसारमाध्यमांमध्ये विरोधात्मक लेखन करण्यात आले असून २४ तासांच्या आत नोटिसीला उत्तर देण्याची सूचना करण्यात आली आहे.